लढणार, लढवणार की हवं त्याला पाडणार ?
पंढरपूर : ईगल आय मीडिया
पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणुक येत्या चार दिवसांत जाहिर होण्याची शक्यता असून, निवडणूक तोंडावर आली तरीही आम.प्रशांत परिचारक यांची भूमिका स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे या निवडणुकीत आ.प्रशांत परिचारक यांची भूमिका काय राहणार याकडे मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.
आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पंढरपूर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणुक येत्या काही दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाने पूर्व तयारी केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने अद्यापही उमेदवारी बाबत पत्ते खुले केलेले नाहीत. ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता जवळपास मावळली असून दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन समाधान अवताडे, शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख शैला गोडसे यांनी निवडणुकीसाठी धावपळ सुरू केली आहे.
तर आ.भारत भालके यांच्या कुटुंबाला उमेदवारी जाहीर होण्याची प्रतीक्षा आहे. त्यांच्या गोटातून ही निवडणुकीची तयारी सुरू झालेली आहे. या पार्श्वभूमीवर विधानपरिषद सदस्य आ.प्रशांत परिचारक यांच्या गटाची भूमिका अद्यापही स्पष्ट झालेली नाही. मागील आठवड्यात कार्यकर्त्यांनीच एक बैठक घेउन निवडणूक लढवण्याची मागणी केली होती. मात्र त्यानंतर ही आ.परिचारक यांची प्रतिक्रिया आलेली नाही.
2014 आणि 2019 या दोन्ही विधानसभा निवडणुकीत परिचारक हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते. यावरून या मतदारसंघातील परिचारक गटाची राजकीय ताकद किती मोठी आहे याची कल्पना येते. मोठे संस्थात्मक, संघटनात्मक जाळे असलेलीे परिचारक गट ही एकमेव राजकीय शक्ती आहे. असे असूनही अद्यापही या पोटनिवडणुकीबाबत परिचारक गटाने काहीच तयारी केलेली नाही. त्यामुळे परिचारक गट निवडणूक लढवणार की भाजप जो उमेदवार देईल त्याच्या विजयासाठी प्रयत्न करणार, की ज्याला पाडायचे आहे त्याला पाडणार ? की याकडे लक्ष लागले.
भाजपकडून आ.परिचारक यांनाही निवडणूक रिंगणात उतरवण्याची चाचपणी केली जात आहे,किंवा त्यांच्या गटाचा उमेदवार मैदानात असेल तर काय होईल याचीही शक्यता पडताळून पाहिली जात आहे.
आ.परिचारक यांच्या कडून उमेदवारी नाही घेतली गेली तर पक्ष जो उमेदवार देईल त्याला निवडुन आणण्याची जबाबदारी आ.परिचारक यांच्यावर टाकली जाईल असेही मानले जाते. परिचारक गटासाठी या निवडणुकीसंदर्भात धरलं तर चवतय आणि सोडलं तर पळतय अशी अवस्था निर्माण झाली आहे.
पांडुरंग परिवाराचे प्रमुख माजी आ.सुधाकरपंत परिचारक यांचेही याच काळात निधन झाले असल्याने पांडुरंग परिवार ही दुःखातच आहे, अशा परिस्थितीत निवडणुकीत उतरण्याची मानसिकता परिचारक कुटुंबाची दिसत नाही. त्याऐवजी आगामी विधानपरिषद, पंढरपूर नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत परिचारक गट पूर्ण ताकदीने उतरुन विरोधी गटाला नामोहरम करण्याची तयारी करीत असावा असे दिसते. तरीही विधानसभेची निवडणुक असूनही परिचारक गटाने अद्याप कसलीही भूमिका घेतली नाही. त्यामुळे परिचारक गट काय करणार ? अशी विचारणा होत आहे.