मोहिते – पाटलांचे मिशन एम एल सी आणि झेड. पी.
माळशिरस : ईगल आय मीडिया
अकलूज नगरपालिका आणि नातेपुते नगरपंचायत मंजुरीचा अध्यादेश हा राष्ट्रवादी काँग्रेस साठी मोठा धक्का मानला जात आहे. विशेष म्हणजे हा धक्का मोहिते – पाटलांनी शिवसेनेच्या मदतीने दिला असल्याने राज्य सरकारमध्ये ही राष्ट्रवादीला तोंड दाबून बुक्क्यांचा मारा सहन करावा लागतो आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यात मोहिते – पाटील यांच्या राजकीय प्रभावाची, प्रश्न सोडवण्याच्या कौशल्याची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. त्याच बरोबर मोहिते पाटलांनी जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक आगामी लक्ष्य ठेवून आक्रमक वाटचाल सुरू केल्याचे दिसून येत आहे.
मोहिते – पाटलामुळे राजकीय आणि संघटनात्मक नुकसान झाल्याने दुखावलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने अकलूज नगरपालिका आणि नातेपुते नगरपंचायतीचा निर्णय अडकवून ठेवला असल्याची चर्चा होती. मात्र मोहिते – पाटलांनी एका बाजूला रस्त्यावरची लढाई हाती घेतली तर दुसऱ्या बाजूला न्यायालयातही धाव घेतली. तिसरीकडे राज्यपाल आणि राज्य सरकारमधील मंत्र्यांच्या भेटी घेऊन या प्रकरणी राष्ट्रवादीची राजकीय कोंडी केली. आणि शेवटी अकलूज नगरपालिका आणि नातेपुते नगरपंचायतीचा अध्यादेश अखेर मिळवला.
राज्यात असलेल्या सत्तेच्या जोरावर कोंडी करण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न मोहिते – पाटलांनी मोठ्या कौशल्याने उधळून लावला आहे. आणि या संदर्भात सत्तेतील सहकारी शिवसेनेच्या मंत्र्यांनी मोहिते पाटलांना सहकार्य केल्याने राष्ट्रवादीला या प्रकरणी तोंडघशी पडावे लागले आहे.
माळशिरस तालुका हा माढा लोकसभा मतदारसंघात निर्णायक आहे. मागील लोकसभा निवडणुकीत केवळ मोहिते – पाटील यांच्यामुळे आणि माळशिरस तालुक्याने दिलेल्या लाखांहून अधिक मतांच्या लिडमुळे हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ढासळला आहे. त्यापाठोपाठ मोहिते – पाटलांनीच जोर लावल्यामुळे पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत ही राष्ट्रवादी ला पराभूत व्हावे लागले आहे. तत्पूर्वी जिल्हा परिषदेत पुन्हा सत्ता मिळवण्याचे राष्ट्रवादीचे स्वप्नही मोहिते- पाटलांच्या धोरणामुळे भंग पावले आहे.
पक्षातून बाहेर पडल्यानंतर मोहिते – पाटलांनी राष्ट्रवादीला जेरीस आणण्याची, मात देण्याची एकही संधी सोडलेली नाही. राष्ट्रवादीवर मात करीत जिल्ह्यात पूर्ववत आपले बस्तान बसविण्याच्या प्रयत्नात असलेल्या मोहिते – पाटलांनी केवळ राजकीयच नाही तर विकास कामांच्या बाबतीत ही आक्रमक भूमिका घेतली आहे.
विशेषतः आ.रणजितसिंह मोहिते – पाटील यांनी आपले सर्व पक्षात असलेले राजकीय स्नेहसंबंध वापरून विकास कामे मंजुरीचा, नवीन प्रस्ताव सादर करण्याचा धडाका लावला आहे. त्याचबरोबर प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सुद्धा मोहिते – पाटील नेटाने प्रयत्नशील असल्याचे दिसते. राष्ट्रवादी अडथळे आणत असल्याचे लक्षात आल्याने राज्य सरकारमधील काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांच्या मदतीने जिल्ह्यातील प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. केवळ माळशिरस नाही तर संपूर्ण जिल्ह्यातील विकासाचे प्रश्न घेऊन मोहिते – पाटील आजही प्रयत्नशील असतात. आ.रणजितसिंह मोहिते- पाटील स्वतः पुणे, मुंबई, दिल्लीत सक्रिय असतातच, मात्र जेष्ठ नेते, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील यांनी सुद्धा कोरोनाची भीती झुगारून शक्य आहे तिथे स्वतः जाऊन प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. दिल्लीत जाऊन त्यांनीही रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, नूतन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या भेटी घेऊन पंढरपूर – फलटण रेल्वे सारख्या प्रलंबित विषयावर लक्ष वेधून घेतले आहे.
मोहिते – पाटील यांची ही धावपळ म्हणजे, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद, नगरपालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत पुन्हा एकदा राष्ट्रवादी ला धोबीपछाड देत आपली ताकद दाखवून देण्याची तयारी सुरू असल्याचे मानले जात आहे. अकलूज नगरपालिका आणि नातेपुते नगरपंचायत अध्यादेश हा मोहिते – पाटलांचा राष्ट्रवादीवरील मोठा विजय असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राष्ट्रवादीला याची मोठी राजकीय किंमत चुकवावी लागेल असे दिसते. सध्या तरी सोलापूर जिल्ह्यात मोहिते – पाटील विरुद्ध राष्ट्रवादी या लढाईत मोहिते- पाटलांनी बाजी मारल्याचे चित्र दिसते आहे.