मोहिते पाटलांचं ठरलंय : माढा लोकसभा निवडणूक लढवणारच

फलटण येथे झाली बैठक : तुतारी हाती घेण्याची शक्यता

पंढरपूर : eagle eye news

माढा लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार मोहिते – पाटलांनी केल्याचे दिसत असून आता माघार नाही या निश्चयाने मोहिते पाटील कामाला लागल्याचे दिसत आहेत. सोमवारी मोहिते पाटील यांची कौटुंबिक बैठक झाल्याचे समजते. त्या बैठकीत लोकसभा निवडणूक लढवण्यावर एकमत झाल्याची माहिती असून त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मंगळवारी जेष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह मोहिते पाटील कुटुंबातील सर्व प्रमुख सदस्य फलटण येथे निंबाळकर कुटुंबाच्या भेटीला गेले होते. त्यावेळी रामराजे नाईक निंबाळकर वगळता त्यांचे दोन्ही बंधू आणि मान – खटाव, कोरेगाव भागातील इतरही नेते उपस्थित होते. यावरून मोहिते पाटील आता लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक – निंबाळकर याना उमेदवारी दिलेली आहे. विशेष म्हणजे या उमेदवारीस मोहिते पाटील यांच्यासह फलटण कर रामराजे नाईक निंबाळकर यांचाही तीव्र विरोध आहे. माढा आणि निंबाळकर पाडा अशी मोहीम सोशल मीडियावर राबवली गेली. खा. निंबाळकर यांची उमेदवारी रद्द करावी अशी मागणी पक्षाकडे करण्यात आली, परंतु त्या मागणीकडे भाजपने साफ दुर्लक्ष केले. विशेष म्हणजे मोहिते पाटील यांची नाराजी दूर करण्याचे फारसे प्रयत्न हि भाजपने केले नाहीत, त्यामुळे मोहिते पाटील आणि रामराजे निंबाळकर समर्थकही प्रचंड नाराज झाले आहेत.

या पार्श्वभूमीवर गेल्या आठ दिवसात धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढा लोकसभा मतदार संघात फिरून चाचपणी केलेली आहे, त्यांना मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सामान्य मतदार यांच्याकडूनही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करून निवडणूक लढवावी असा आग्रह होतो आहे. मतदार, कार्यकर्ते आणि पदाधिकऱ्यांचा कल, तसेच भाजप आणि खा. निंबाळकर यांच्याविरोधात असलेली नाराजीची लाट लक्षात घेऊन मोहिते पाटील यांनी निवडणूक लढवण्याचा निर्धार केल्याचे दिसून आले आहे.

सोमवारी अकलूज येथे मोहिते -पाटील कुटुंबाची बैठक झाल्याची खात्रीशीर माहिती असून त्यावेळी आ. रणजितसिंह मोहिते -पाटील यांच्या शिवाय इतर सर्व कुटुंबीयांनी निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केल्याचे समजते. त्यापाठोपाठ मंगळवारी जेष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांनी स्वतः फलटण येथे जाऊन रामराजे नाईक निंबाळकर कुटुंबाची आणि माण, खटाव, कोरेगाव भागातील इतर नेत्यांची बैठक घेतली. त्यामुळे मोहिते पाटील निवडणूक मैदानातून परत माघार घेणार नाहीत असे निश्चित मानले जात आहे. येत्या काही दिवसात धैर्यशील मोहिते – पाटील हे अधिकृतरीत्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करतील आणि लोकसभा निवडणुकीत शड्डू मारतील असे मानले जात आहे.

मंगळवारी फलटण येथे झालेल्या बैठकीला संजीवराजे नाईक निंबाळकर, रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जयसिंह मोहिते पाटील,अनिकेतराजे रामराजे निंबाळकर, धैर्यशील मोहिते पाटील, अर्जुनसिंह मोहिते पाटील, शिवतेजसिंह मोहिते पाटील, सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, सुरेंद्र गुदगे, मनोज पोळ, नंदकुमार मोरे आदी उपस्थित होते.


मोहिते – पाटील यांचे उघड बंड आणि त्यांना रामराजे निंबाळकर यांची छुपी साथ, तसेच माण, खटाव, कोरेगाव भागातील शरद पवारांना मानणारा मोठा मतदार, करमाळा तालुक्यातून माजी आ. नारायण पाटील, सांगोला तालुक्यातील देशमुख कुटुंब आणि माढा तालुक्यातील मोहिते पाटील समर्थक यांच्या बळावर भाजप समोर तगडे आव्हान उभा राहणार असल्याचे दिसून येत आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!