खा. निंबाळकर, बाळा भेगडे यांनी कल्याणराव काळे यांची केली मनधरणी

पंढरपूर : ईगल आय मीडिया

भारतीय जनता पक्षाचे नेते कल्याणराव काळे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करीत आहेत. त्यांनी पक्ष सोडू नये आणि भाजप उमेदवार समाधान अवताडे यांचा प्रचार करावा यासाठी आज माढा चे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, पक्ष निरीक्षक बाळा भेगडे यांनी त्यांच्या कार्यालयात जाऊन मनधरणी केली. मात्र काळे यांनी त्यांना आपला निर्णय ठाम झाल्याचे सांगितले. त्यानंतर निराश होऊन निंबाळकर, भेगडे परतले.

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक सुरू असून भाजपचे नेते कल्याणराव काळे दोन दिवसांत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करीत आहेत. सध्या त्यांचे कार्यकर्ते राष्ट्रवादी चे उमेदवार भगीरथ भालके यांचा प्रचार करीत आहेत. भाजपला हा मोठा धक्का असून काळे यांनी भाजप सोडू नये यासाठी पक्षाकडून प्रयत्न सुरू आहेत.

आणि संजयमामा शिंदे आले !

कल्याणराव काळे यांच्या कार्यालयात खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर आले असल्याची कल्पना आ संजयमामा शिंदे यांना नव्हती. आणि निंबाळकर येत असल्याचे काळे यांनाही माहीत नव्हते. काळे यांच्या घरी गेलेले निंबाळकर ते तिथं नसल्याचे समजताच कार्यालयात आले. मात्र अगोदरच काळे यांच्याकडे संजयमामा शिंदे निघाले होते. तत्पूर्वी खा. निंबाळकर काळे यांच्या कार्यालयात पोहोचले होते. तरीही संजयमामा शिंदे कार्यालयात गेले. आणि ते आल्याचे पाहताच निंबाळकर यांनी काळे यांच्या कार्यालयातून बाहेर जात – जातच चर्चा केली.

आज दुपारी रणजितसिंह नाईक निंबाळकर, बाळा भेगडे यांनी काळे यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली. पक्ष सोडू नये, आपल्या अडचणी दूर केल्या जातील अशी गळ घातली. मात्र काळे यांनी आपण पक्ष सोडत असल्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगून आलो आहे. आपली पक्षा बाबत,किंवा नेतृत्वाबाबत काही तक्रार नाही. कारखानदारीचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांची भावना लक्षात घेऊन भाजप सोडत असल्याचे सांगितले. त्यानंतर निंबाळकर आणि भेगडे यांनी शेवटी काळे यांचा निरोप घेतला.

https://chat.whatsapp.com/IcMfmYWcFIs7jgNSzE3k28

ताज्या आणि विशेष बातम्यांसाठी वरील लिंकवरून आमच्या व्हाट्स ap ग्रुपमध्ये सामील व्हा!

Leave a Reply

error: Content is protected !!