पंढरपूर राष्ट्रवादीतील मतभेद मिटवण्यासाठी खा. पवार घेणार बैठक

काळे – भालके – पाटलांना सोलापुरात बोलवून घेत केली चर्चा

पंढरपूर : eagle eye news

पंढरपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस आणि विठ्ठल परिवारात असलेली गटबाजी आणि नेत्यांमधील मतभेद मिटवण्यासाठी लवकरच मुंबईत सर्व नेत्यांची बैठक बोलावली जाईल अशी ग्वाही राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी  दिली आहे. सोलापूर येथे खा. शरद पवारांनी  कल्याणराव काळे, युवराज पाटील, भगीरथ भालके , गणेश पाटील यांच्याशी चर्चा केल्यानंतर यासंदर्भात आश्वासन दिले.

रविवार ( दि. ७ एप्रिल ) रोजी खा. शरद पवार हे पंढरपूर तालुका दौऱ्यावर होते. यावेळी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्याच वेळी राष्ट्रवादीचे स्थानिक नेते कल्याणराव काळे, युवराज पाटील, भगीरथ भालके आणि ऍड. गणेश पाटील यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण नव्हते. त्यामुळे हे नेते विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरील कार्यक्रमास उपस्थित नव्हते. मात्र त्यांनी मेकॅनिकल चौक येथे  खा. पवारांच्या स्वागताची तयारी केली होती. त्यावेळी पवारांनी रस्त्यावर उतरून स्वागताचा स्वीकार केला. मात्र चर्चा होऊ शकली नाही. त्यानंतर विठ्ठल दर्शन घेऊन पवार सोलापूर मुक्कामी आले.

त्यानंतर पवारांनी काळे, भालके आणि पाटील यांना सोमवारी सकाळी ७ वाजता सोलापूर येथे भेटीसाठी येण्याचा निरोप दिला. त्यानुसार कल्याणराव काळे, युवराज पाटील, भगीरथ भालके, ऍड. गणेश पाटील यांनी सोलापूर येथे जाऊन पवारांची भेट घेतली. यावेळी सुमारे २० मिनिटे चर्चा झाली. पवारांनी यावेळी एकोप्याने काम करा, एकमेकांच्या संस्था, संघटना यामध्ये हस्तक्षेप करू नका असा सल्ला दिला. तसेच अभिजित पाटील यांच्यासह काळे, भालके, पाटील यांनाही या बैठकीत बोलावून गटबाजी आणि मतभेद मिटवू, पुढील निवडणूक आणि राजकीय वाटचालीसाठी मार्ग काढू असे आश्वासन दिले.

तालुक्यातील प्रश्नांवरही झाली चर्चा
यावेळी खा. पवारांनी पंढरपूर तालुकयातील प्रश्नांवर हि चर्चा केल्याचे समजते. पंढरपूर शहरातील प्रश्न, प्रस्तावित कॉरिडॉर, तालुक्यातील उसाचे क्षेत्र, इतर पिकांची परिस्थिती, साखर कारखानदारी आणि मागील महिन्यातझालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचीही माहिती घेतली असल्याचे कल्याणराव काळे, भगीरथ भालके यांनी सांगितले आहे. अभिजित पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे पक्षात अगोदरच असलेल्या काळे, भालके, आणि पाटील यांची राजकीय कोंडी होणार असून त्यांच्या समर्थकांची नाराजी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर पवारांनी या नाराजीची दाखल घेत काळे, भालके, पाटील यांना बोलावून घेतल्याने समर्थकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!