बिहारमध्ये घड्याळाची ही टिकटिक वाजलीच नाही

पाव टक्का मते पदरात : सर्व उमेदवारांची अनामत जप्त

टीम : ईगल आय मीडिया

बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेने पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे ही पूर्णपणे पानिपत झाले आहे. तब्बल 145 उमेदवार रिंगणात उतरवलेल्या राष्ट्रवादी ला जेमतेम 0.23 टक्के मते मिळाली आहेत. सर्वच उमेदवारांची डिपॉझिट ही जप्त झाले आहे. त्यामुळे बिहारमध्ये मराठी पक्ष लोकांनी सपशेल नाकारले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने राजद-काँग्रेस महाआघाडीत घुसण्याचा प्रयत्न केला मात्र एन्ट्री मिळाली नाही. विशेष म्हणजे याच महाघाडीत 2014 साली लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी ला कटिहार ची जागा सोडली होती आणि त्या जागेवर तारिक अन्वर हे जिंकलेही होते. मात्र विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला आजवर बिहारमध्ये खाते खोलता आलेले नाही.

या पार्श्वभूमीवर राजद – काँग्रेस ने राष्ट्रवादीला परस्पर कटवून टाकले होते. दुखावलेल्या राष्ट्रवादीने मग 145 उमेदवार जाहीर केले आणि निवडणूकिसाठी स्टार प्रचारकांची यादीही घोषित केली होती. परंतु पक्षाचा एकही स्टार प्रचारक बिहारकडे फिरकला नाही असे दिसून आले. त्यामुळे सर्व उमेदवार आपापल्या कुवतीनुसार लढले आणि धारातीर्थी पडले. राष्ट्रवादी च्या सर्व उमेदवारांची एकूण मतांची टक्केवारी जेमतेम 0.23 टक्के म्हणजे पाव टक्का सुद्धा होत नाहीत.

एका बाजूला शिवसेनेच्या सर्व उमेदवारांची अनामत गेलेली असताना इकडे राष्ट्रवादी ची सुद्धा वाताहत होऊन पक्षाला मोठ्या नामुष्कीला सामोरे जावे लागले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!