पंढरपूर पोटनिवडणुकीवर महाविकास आघाडीचे वर्चस्व

अखेरच्या टप्प्यात भाजपने ही काढले भावनिक कार्ड


पंढरपूर : ईगल आय मीडिया


संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीवर प्रचाराच्या अंतिम टप्प्यात ही महाविकास आघाडीचेच वर्चस्व असल्याचे दिसून येते. दिवंगत आ.भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने स्व.भालके यांचे सुपुत्र भगीरथ यांना उमेदवारी दिली असून त्यांच्या विजयासाठी शिवसेना, काँग्रेस सह महाविकास आघाडी एकजुटीने काम करताना दिसून येत आहे. दरम्यान भाकपकडून उद्योजक समाधान अवताडे यांना निवडणूक रिंगणात उतरवले असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह इतर अपक्ष 21 उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांना दिवंगत भारत भालके यांच्याविषयी असलेल्या सहानुभूतीचा फायदा होत असताना भाजपकडून या भावनीकतेची खिल्ली उडवण्यात येत होती. मात्र निवडणूक पुढे जाईल तसे भाजपच्या अडचणी वाढत गेल्या. दरदिवशी वातावरण प्रतिकूल होत असल्याचे पाहून अखेरीस भाजपनेही इमोशनल कार्ड काढले आहे. दिवंगत सुधाकपंत परिचारक यांना श्रद्धांजली म्हणून समाधान अवताडे यांना मतदान करा, अशी भावनिक साद भाजपने घातली आहे. आता ही भावनीकता भाजपसाठी कितपत लाभदायक ठरते हे 2 मे रोजी दिसणार आहे.


राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक होत असून या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. आ.भारत भालके हे 2009 पासून येथून निवडून येत आहेत. मात्र नोव्हेंबर 2020 मध्ये त्यांचे अकाली निधन झाले. त्यानंतर त्यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली असून महाविकास आघाडीचे घटकपक्ष या निवडणुकीत एकजुटीने काम करीत आहेत. शिवसेना, काँग्रेस, प्रहार संघटना, पीपल्स रिपब्लिक पार्टी, समाजवादी पार्टी आशा घटक पक्षाचे कार्यकर्ते या निवडणुकीत प्रचारात आघाडीवर आहेत. मात्र महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानी पक्षाने स्वतंत्र उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवला असून माजी खा. राजू शेट्टी यांनी मतदारसंघात तळ ठोकला आहे.

महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर झालेल्या विधानपरिषदेेच्या पुणे विभागीय पदवीधर आणि शिक्षक दोन्ही निवडणुकांत महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या मतांनी विजयी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर ही पोटनिवडणुक महाविकास आघाडीने प्रतिष्ठेची केली असून उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासह, पालकमंत्री दत्तमामा भरणे, शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील, उदय सामंत, मंत्री धनंजय मुंढे, आ.सुनील शेळके, आ.प्रणिती शिंदे यांच्यासह राज्य पातळीवरील अनेक नेत्यांनी निवडणूक प्रचारासाठी हजेरी लावली आहे.


भाजपने सुद्धा ही पोटनिवडणुक प्रतिष्ठेची केली असून या निवडणुकीत विजय मिळवून राज्यभरात महाविकास आघाडीवरोधात जनमत असल्याचा संदेश घेऊन जायचा प्रयत्न चालवला आहे. त्यामुळेच 2014, 2019 ला परस्परविरोधी लढलेले परिचारक आणि अवताडे यांची भाजपने मोट बांधलेली आहे. आ.प्रशांत परिचारक, आ.रणजितसिंह मोहिते पाटील, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ.गोपीचंद पडळकर, माजी मंत्री, बाळा भेगडे, राम शिंदे, सदाभाऊ खोत यांना मैदानात उतरवले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याही सोमवारी मतदारसंघात 7 प्रचार सभा झाल्या.


याशिवाय भाजप उमेदवार समाधान अवताडे यांचे चुलत बंधू सिद्धेश्वर अवताडे, अपक्ष उमेदवार शैला गोडसे, स्वाभिमानाचे उमेदवार सचिन शिंदे यांच्या उमेदवारी ने प्रचारात रंग भरले आहेत.
आ.भारत भालके यांच्या निधनानंतर होत असलेल्या या निवडणुकीत त्यांच्या कुटुंबाविषयी असलेली सहानुभूती ची लाट स्पष्टपणे दिसत असून, आ.भालके यांची सर्व सामान्यांमध्ये असलेली लोकप्रियता, त्यांनी केलेली विकासकामे आणि महाविकास आघाडी सरकारकडून असलेल्या अपेक्षा या जोरावर ही पोटनिवडणुक महाविकास आघाडी जिंकेल असे आजचे चित्र आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!