वंचितांना संधी की, प्रस्थापितांची चांदी ?

सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक अध्यक्ष पदासाठी आज मुलाखती होणार !

सोलापूर : ईगल आय मीडिया

सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्षपदासाठी युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख सोलापुरात मुलाखती घेणार आहेत. मात्र या मुलाखतीनंतर पात्र, प्रामाणिक, निष्ठावंत, उपेक्षित आणि वंचित कार्यकर्त्यास संधी मिळणार की पक्षाच्या परंपरेनुसार प्रस्थापितांची चांदी होणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस हा सोशल इंजिनियरिंग राबवणारा पक्ष असल्याचे राज्यात आणि देशात प्रत्यक्ष कृतीतून दिसून आलेले आहे. पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार हे सर्व समावेशकतेचे राजकारण करणारे नेते म्हणूनही ओळखले जातात. त्यामुळेच त्यांनी राष्ट्रवादी युवक च्या प्रदेशाध्यक्षपदी अल्पसंख्याक वर्गातील युवकास संधी दिली तर युवती अध्यक्षस्थानी ओबीसी घटकातील सक्षणा सलगर यांच्या सारख्या वंचित घटकांतील प्रतिनिधीची नियुक्त केली आहे. राज्य मंत्रिमंडळातही राष्ट्रवादी च्या कोट्यातून 50 टक्के मंत्री सामाजिक समतोल साधून निवडलेले आहेत. राष्ट्रवादीचे मधुकर पिचड, छगन भुजबळ, अरुण गुजराथी, सुनील तटकरे असे प्रदेशाध्यक्ष ओबीसी वर्गातून निवडले गेले आणि उपमुख्यमंत्री हे या पक्षाला मिळालेले राज्यातील सर्वोच्च पदही ओबीसी वर्गासाठी दिले होते.

असे असताना सोलापूर जिल्ह्यात मात्र वेगळेच चित्र असून इथं नेहमीच प्रस्थापितांना संधी देताना अन्य समाजातील पात्र कार्यकर्त्यांना मात्र संधी मिळालेली नाही. आजवर सोलापूर जिल्ह्यातील महत्वाच्या पदावर वंचित, बहुजन आणि अल्पसंख्याक समाजाला स्थान मिळालेले नाही. सद्यस्थितीत जिल्ह्यात अध्यक्ष, कार्याध्यक्ष, महिला आघाडी, युवक आघाडी, युवती आघाडीसह विविध सेल ची महत्वाची पदे ही ठराविक समाजातील कार्यकर्त्यांना दिलेली आहेत. अगदी ज्या आघाडीवर अशक्य आहे तिथेच त्या – त्या समाज घटकांचे प्रतिनिधित्व दिसून येते.

पक्षावर प्रेम असणारे अनेक पात्र कार्यकर्ते पक्षात मानाच्या पदासाठी संघर्ष करीत संधीपासून ” वंचित ” राहत आहेत. या वर्गातील कार्यकर्त्यांची घुसमट होत असून जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांना ही घुसमट जाणवतही नाही. सत्ता नसताना हेच ‘वंचित’ घटकातील कार्यकर्ते रस्त्यावर उतरून संघर्ष करीत होते. जेव्हा सत्ता आली तेव्हा 5 वर्षे गायब असलेले सगळे प्रस्थापित लोक बाह्य मागे सारून पुढे आले आहेत. त्यामुळे वंचित समाज घटकातील कार्यकर्ते पुन्हा उपेक्षित राहत असल्याचे चित्र आहे.

या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख सोलापूर मध्ये येऊन इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहेत. या मुलाखतीमधून खरोखरच पात्र, निष्ठावान, मागील 5 वर्षे संघर्ष करणाऱ्या आणि उपेक्षित, वंचित घटकांचे प्रतिनिधित्व असलेल्या कार्यकर्त्यास संधी मिळणार की मुलाखतीचा फार्स रंगवून नेत्यांच्या शिफारशीनुसार प्रस्थापितांनाच लादले जाणार याकडे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!