सर्वांना विश्वासात घेवून गावचा विकास साधला जाईल : नितीन शिंदे
प्रतिनिधी : eagle eye news
भाळवणी ( तालुका : पंढरपूर) येथील ग्रामपंचायत नूतन उपसरपंचपदी पांडुरंग परिवार व शिवसेना ठाकरे गट समविचारी आघाडीचे नितीन शिंदे यांची बहुमताने निवड झाली आहे.
येथील विद्यमान उपसरपंच सविता लोखंडे यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त असलेल्या उपसरपंच पदाची निवडणूक येथील ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच रणजीत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार (दि.२४) रोजी पार पडली.
समविचारी आघाडीकडून नितीन पांडुरंग शिंदे, वनिता दत्तात्रय लिंगे तर विरोधी काळे गट व तिसरी आघाडी यांच्याकडून जहराबी मुसा शेख यांनी उपसरपंच पदासाठी अर्ज दाखल केले होते. छाननीनंतर वनिता लिंगे यांनी आपला अर्ज माघारी घेतल्यानंतर दोन अर्ज राहिल्याने निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली. यावेळी उमेदवार जहराबी शेख यांनी मतदान गुप्त पद्धतीने घेण्यात यावे असा अर्ज केल्याने संपूर्ण निवडणुका प्रक्रिया गुप्त पद्धतीने घेण्यात आली.
पांडुरंग परिवार व शिवसेना ठाकरे गटाने मला उपसरपंचपदाची संधी दिली आहे. त्या विश्वासाला पात्र राहून सर्वांना बरोबर घेवून व सर्वसामान्य लोकांचा विकास केंद्रस्थानी ठेवून गावचा विकास साधला जाईल.
– नितीन पांडुरंग शिंदे उपसरपंच, ग्रामपंचायत, भाळवण

या निवडणूक प्रसंगी सर्व १७ सदस्य उपस्थित होते. यावेळी नितीन शिंदे यांना १० मते तर जहराबी शेख यांना ७ मते पडली. त्यामुळे अध्याशी अधिकारी सरपंच रणजीत जाधव यांनी नितीन शिंदे यांची उपसरपंचपदी निवड झाल्याची घोषणा केली. यावेळी ग्रामविकास अधिकारी वाघमारे यांचे सहकार्य लाभले. सदर निवडीनंतर पांडुरंग परिवार व शिवसेना ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी गुळाला उधळून फटाक्याची आतषबाजी करून आनंद उत्सव साजरा केला.
यावेळी पांडुरंग सहकारी कारखान्याचे संचालक भगवान चौगुले, शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, हरिभाऊ शिंदे, सदस्य राजीव पाटील, विठ्ठल चौगुले, सचिन कुचेकर, पोपट इंगोले, सदस्या वनिता लिंगे, अरुणा गवळी, स्वाती माने, सविता शिंदे, सुरेखा शिंदे आदी पांडुरंग परिवार व शिवसेना ठाकरे गटातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.