पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीची तयारी सुरू

मार्च महिन्यात निवडणूक जाहीर होण्याची शक्यता !

पंढरपूर : ईगल आय मीडिया

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत आम. भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची प्रशासकीय तयारी सुरू झाली आहे. मार्च महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात निवडणूक जाहीर होण्याची अपेक्षा असून एप्रिलमध्ये मतदान होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या मतदारसंघातील मतदान केंद्रे, त्यांची संख्या, मतदारसंघातील संवेदनशील गावे, तसेच उपद्रवी लोकांची यादी तयार करण्यात येत आहेत. परवाना धारक शस्त्रे आणि त्यांची यादी करणे, संभाव्य पोलीस बंदोबस्त किती लागेल याची माहिती घेतली जात आहे. त्याचबरोबर पोटनिवडणुकीसाठी आवश्यक evm सेटिंगची प्रक्रिया दोन दिवसांपासून सुरू झाली आहे. ही प्रक्रिया अगदी प्राथमिक स्वरूपाची मार्चमध्ये निवडणूक जाहिर होण्याची शक्यता आहे.

पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे 11 वर्षे प्रतिनिधित्व करणारे आम. भारत भालके यांचे 28 नोव्हेंबर रोजी अकाली निधन झाले. त्यामुळे पंढरपूर विधानसभेची जागा रिक्त आहे. या जागेसाठी पोटनिवडणुक लागणार आहे. रिक्त झाल्यापासून 6 महिन्यात पोटनिवडणुक घ्यावी लागणार आहे. त्यामुळे पोलीस, महसूल आणि निवडणूक प्रशासन या पोटनिवडणुकीच्या कामाला लागले आहे.

नुकत्याच ग्रामपंचायत निवडणुका झाल्याने मतदार यादी अद्ययावत आहे. 2019 च्या तुलनेत मतदान केंद्रांची संख्या वाढण्याची अपेक्षा आहे. दरम्यान 15 मार्चच्या जवळपास पोटनिवडणुकीची घोषणा होऊन एप्रिल महिन्यात मतदान होण्याची तसेच पश्चिम बंगाल विधानसभेच्या मतमोजणी दिवशी पंढरपूर पोटनिवडणुकीची ही मतमोजणी होण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!