पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा निवडणुकीत परिचारक कोणती भूमिका घेणार ?

भाजप नको अपक्ष लढा किंवा तुतारी घ्या : कार्यकर्त्यांनी दिले दोन पर्याय

पंढरपूर : eagle eye news

माजी आ. प्रशांत परिचारक यांचा गट आगामी विधानसभा निवडणुकीत कोणती भूमिका घेणार याकडे पंढरपूर तालुक्याचे लक्ष लागले आहे. नुकतीच परिचारक गटाने घेतलेल्या बैठकीत बहुतांश कार्यकर्त्यांनी भाजप ऐवजी अपक्ष निवडनुक लढवावी असा सूर लावला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी हातात घ्यावी अशा सूचनाही मोठ्या प्रमाणात आल्या आहेत. त्यामुळे परिचारक कोणती भूमिका घेतात याकडे तालुक्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

मागील आठवड्यात परिचारक यांनी पंढरपूर तालुक्यातील आपल्या सामर्थकांना बोलावून घेतले आणि लोकसभा निवडणुकीत आपापल्या गावात काय झाले आणि कसे झाले याची विचारपूस केली. यावेळी बहुतांश कार्यकर्त्यांनी, लोकांची भाजपला मतदान करण्याची इछा नव्हती, त्यामुळे भाजपचा पराभव झाल्याचे सांगीतले. त्याच दरम्यान, भाजप विषयी लोकांमध्ये नाराजी असून विधानसभा निवडणुकीत आपण अपक्ष लढले पाहिजे, काही कार्यकर्त्यांनी तुतारी चिन्ह हातात घ्यावे अशीही सूचना केली असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत परिचारक अपक्ष उतरतील असे मानले जात आहे.

भाजप आमदारास परिचारक देणार आव्हान
लोकसभा निवडणुकीवर चर्चा करण्यासाठी आलेले कार्यकर्ते प्रत्यक्षात आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपकडून नको तर अपक्ष लढायला हवे अशी सूचना नेत्यांना करीत असल्याचे दिसून आले. पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात भाजपचे समाधान अवताडे हे सध्या आमदार आहेत, तरीही निवडणूक लढवली पाहिजे असा कार्यकर्त्यांचा रेटा दिसून आला. यावरून येत्या दोन महिन्यात पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यात परिचारक आणि आ. अवताडे यांच्यात खडाजंगी सुरु होण्याची लक्षणे दिसत आहेत. भाजप ची डोकेदुखी यामुळे वाढणार असलयाचे मानले जात आहे.

पांडुरंग परिवाराचे प्रमुख, भाजप नेते माजी आमदार प्रशांत परिचारक यांचा गट पंढरपूर तालुक्यात प्रबळ आहे, तरीही परिचारक समर्थक गावात, पंढरपूर शहरातही भाजपच्या उमेदवारांना खूप मोठ्या प्रमाणात पिछाडीस राहावे लागले. याची कारण मीमांसा जाणून घेण्यासाठी परिचारक यांनी वाखरी येथील कर्मयोगी सभागृहात गावनिहाय आणि शहरातील कार्यकर्त्यांना बोलावून असे का झाले ? कुणी काम केले, कुणी केले नाही ? लोकांनी भाजपला मतदान का केले नाही याची विचारणा केली.


पंढरपूर तालुक्यात महाविकास आघाडीच्या दोनही उमेदवारांना ५५ हजारांचे मताधिक्य

नुकत्याच झालेल्या माढा लोकसभा निवडणुकीत पंढरपूर तालुक्यातील ५९ गावातून २२ हजारांचे मताधिक्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाले आहे. तर सोलापूर लोकसभा मतदारसंघात समाविष्ट भागात सुमारे ३२ हजार मतांचे लीड काँग्रेस पक्षाला मिळाले आहे. पंढरपूर तालुक्याचा समावेश असलेल्या चारही विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत, तरीहि भाजप उमेदवारास खूपच पिछाडीवर रहावे लागले यावरून पंढरपूर तालुक्यात केंद्र आणि राज्य सरकारविषयी प्रचंड नाराजी असल्याचे समोर आले आहे. नाराजीचा हा सूर विधानसभा निवडणुकीपर्यंत कायम राहील असे दिसून येत आहे. त्यामुळे सत्ताधारी गटाच्या आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे. त्यातच मोहिते पाटील यांनी पुन्हा जिल्ह्यातील राजकारणाची मोट बांधण्यास प्राधान्य दिल्याने आगामी निवडणुकीत जिल्ह्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व निर्माण होण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!