आ. परिचारक गट पक्षादेशाचे पालन करणार !
पंढरपूर : ईगल आय मीडिया
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाची उमेदवारी दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन समाधान अवताडे यांनाच मिळणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. आम.प्रशांत परिचारक आणि समाधान अवताडे या दोघांवर भाजप श्रेष्ठींनी उमेदवारीचा निर्णय सोपवला असून परिचारक लढण्यासाठी इच्छुक नाहीत, त्यामुळे उमेदवारीची माळ अवताडे यांच्याच गळ्यात पडणार असल्याचे सूत्रांकडून समजते. विशेष म्हणजे त्याच अनुषंगाने अवताडे यांची यंत्रणा प्रचाराच्या कामाला लागली आहे तर परिचारक यांचे कार्यकर्ते कसलाही आदेश नसल्याने अस्वस्थ आहेत.
दोन दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या बैठकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व नेत्यांशी चर्चा केल्यानंतर, अखेरीस आ. प्रशांत परिचारक आणि समाधान अवताडे या दोघांना बोलावून घेत ‘तुम्हा दोघांपैकी एक जण लढावं’ अशी सूचना केल्याचे समजते. मात्र आ. प्रशांत परिचारक यांची लढण्याची मानसिक तयारी नाही. त्यामुळे उमेदवारी समाधान अवताडे यांना मिळणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. दिवंगत आम भारत भालके यांच्या निधनानंतर होत असलेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादी ची उमेदवारी भालके कुटुंबाला मिळणार हे निश्चित मानले जाते. मात्र विरोधात कोण उमेदवार असणार हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. भाजपकडून अनेकांनी उमेदवारी अर्ज मागणी केली असली तरी अद्यापही एका नावावर सहमती झालेली नाही.
आज किंवा उद्या समाधान अवताडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा भाजपकडून केली जाण्याचीही शक्यता आहे. आ.परिचारक यांनी आज 22 गावातील कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे, बुधवारी मंगळवेढा, पंढरपूर शहरातील कार्यकर्त्यांशी चर्चा केली आहे. त्यांचा सूर हा ‘ पक्ष देईल त्या उमेदवाराचे काम करू ‘ असा दिसून येतोय. त्यामुळे समाधान अवताडे यांनाच भाजपची उमेदवारी मिळणार असल्याचे मानले जात आहे.