पंढरपूर पोटनिवडणूक : उमेदवारीसाठी चाचपणी

भाजपकडून समाधान अवताडे यांच्या नावाला पसंती

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पंढरपूर विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर होताच उमेदवारीसाठी धावपळ सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी भालके कुटुंबात असेल असे निश्चित मानले जात.तर भारतीय जनता पक्षाकडून दामाजी सहकारी चे अध्यक्ष समाधान अवताडे यांच्या नावाला प्राधान्य दिले जात आहे. अवताडे भाजपची उमेदवारी घेणार का यावर निवडणुकीचे चित्र अवलंबून आहे.

राष्ट्रवादीचे आ. भारत भालके यांचे निधन झाल्यानंतर पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. निवडणूक जाहीर होताच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसोबत प्रदेशाध्यक्षांनी मुंबईत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली. त्यांनी अद्याप उमेदवार जाहीर केला नसला तरी भालके कुटुंबातील उमेदवार दिला जाणार असल्याचे चित्र आहे.

तर भाजप कडून उमेदवारीची चाचपणी सुरू असून, आ.प्रशांत परिचारक, दामाजी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समाधान अवताडे यांच्या नावांवर सध्या पक्षात जोरदार खलबते सुरू आहेत. पांडुरंग परिवाराचे प्रमुख माजी आम सुधाकरपंत परिचारक यांचे निधन झाल्याने आ.परिचारक हे या निवडणुकीत उतरण्यास इच्छुक नाहीत. त्यामुळे सध्या तरी भाजपकडून समाधान अवताडे यांच्या नावावर गंभीरपणे चर्चा सुरू आहे. समाधान अवताडे यांनी राष्ट्रवादी च्या नेत्यांची भेट घेऊन उमेदवारी मागितली होती असे समजते. मात्र राष्ट्रवादीकडून अद्यापही काही सिग्नल मिळालेला नाही. तर अवताडे यांनी भाजप पुरस्कृत उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

महाविकास आघाडीचा घटकपक्ष, भाजपा, रासपसह इतर लहान मोठ्या पक्षांनी उमेदवारांबाबत तर इच्छुकांनी पक्षांकडे आपल्या उमेदवारीविषयी चाचपणी सुरू केली आहे.शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख सौ. शैला गोडसे यांनी शिवसेनेकडे उमेदवारी मागितली आहे. मात्र महाविकास आघाडीची उमेदवारी भालके कुटुंबात दिल्यास निवडणूक लढवण्याबाबत फेरविचार करणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून समजते.

23 मार्च पासून प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सुरूवात होणार आहे. ३० मार्च उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने त्याअगोदर सत्ताधारी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीसह विरोधीपक्ष असलेल्या भाजप व इतर पक्षांना आपापले उमेदवार जाहीर करावे लागणार आहेत.

मंगळवारी मुंबईमध्ये पंढरपूर राष्ट्रवादीमध्ये पदाधिकारी निवडीवरून झालेले मतभेद त्यानंतर काही कार्यकर्त्यांनी मुंबईत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. येत्या काही दिवसात मतदारसंघातील सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन पक्ष आपली भूमिका स्पष्ट करेल, असे सांगण्यात आले असले तरी आ. भालके यांचे पूत्र भगिरथ भालके हे कामाला लागले आहेत.

या प्रमुख पक्षांव्यतिरिक्त वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे या आठवड्यात पंढरपूरला येत आहेत. त्यामुळे त्यांचे कार्यकर्तेही पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सक्रीय होताना दिसत आहेत. धनगर समाजानेही होळकर वाड्यात बैठक घेत आमच्या समाजाला प्रतिनिधीत्व न दिल्यास वेगळा विचार करण्याची भूमिका जाहीर केली आहे. महादेव जानकर रासपकडून गाठीभेटी घेत आहेत. त्यामुळे संपूर्ण मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर होताच खलबते सुरू असल्याचे चित्र आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!