पोटनिवडणूक लढवा : पांडुरंग परिवाराच्या कार्यकर्त्यांचा दबाव

गुरुवारी 22 गावातील कार्यकर्त्यांची बैठक

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक परिवाराच्या राजकीय अस्तित्वासाठी लढवावी लागेल अशी मागणी वाढत असून पांडुरंग परिवाराच्या नेत्यांवर कार्यकर्त्यांचा दबाव वाढू लागला आहे. त्यामुळेच मागील दोन दिवसांपासून पांडुरंग परिवाराच्या बैठकांच्या फ़ेऱ्या सुरू झाल्या आहेत. आजही महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली असून उद्या ( दि 25 ) मार्केट यार्डात 22 गावांतील कार्यकर्त्यांची बैठक बोलावण्यात आलेली आहे.

दरम्यान, गुरुवारी दुपारी बाजार समितीच्या आवारात पांडुरंग परिवाराच्या 22 गावातील सर्व कार्यकर्त्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. यावेळी आम.प्रशांत परिचारक यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. त्यामुळेच उद्याच्या बैठकीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कडून दिवंगत आम. भारत भालके यांच्या कुटुंबातील उमेदवार निश्चित झालेला आहे. त्यांच्या विरोधात एकच उमेदवार असावा अशा पद्धतीने भाजपने नियोजन सुरू केले आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून समाधान अवताडे यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची आणि त्यांचा प्रचार करावा लागणार असल्याची कुनकुन पांडुरंग परिवारातील कार्यकर्त्यांना लागली आहे. त्यामुळेच अस्वस्थ झालेल्या कार्यकर्त्यांनी पोटनिवडणूक लढवण्याची आग्रही मागणी नेत्यांकडे केली आहे.

मंगळवारी याच संदर्भात मंगळवेढा तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बाजार समितीमध्ये झाल्याचे समजते. तर आज बुधवारी युटोपीयन चे चेअरमन उमेश परिचारक, नगराध्यक्षा साधना भोसले यांच्यासह पंढरपूर शहरातील प्रमुख पदाधिकारी,आजी, माजी नगराध्यक्ष, नगरसेवक यांची बैठक संपन्न झाली. यावेळी सुद्धा सर्व पदाधिकाऱ्यांनी पोटनिवडणूक लढवावी अशी मागणी लावून धरली. त्यामुळे आज दिवसभर याच बैठकीची चर्चा शहरात सुरू होती.

Leave a Reply

error: Content is protected !!