103 पैकी निम्म्या गावात परिचारक – अवताडे यांच्यावर भालके भारी !
पंढरपूर शहर आणि ग्रामीण मध्ये परिचारक – अवताडेना भालके यांच्यापेक्षा केवळ 4160 मते जास्त
पंढरपूर : ईगल आय मीडिया
पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदार संघात परिचारक आणि अवताडे यांची मोट बांधून भाजपने 1 लाख 60 हजार मतांचा उभा केलेला भुलभुलैय्या कोसळण्याच्या मार्गावर असून 2019 च्या मतांची आकडेवारी आणि आजची परिस्थिती पाहिली असता एकटा भालके गट परिचारक -अवताडे आघाडीस तोडीस तोड असल्याचे दिसून येते. त्यात भर पडली आहे ती शिवसेना आणि मंगळवेढा तालुक्यातील स्थानिक नेत्यांची, जे मागील निवडणुकीत परिचारक, अवताडे यांच्या सोबत होते. त्यामुळे उद्या मतदान होत असलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांचेच पारडे जड असल्याचे मतदानाच्या बेरजेचे आकडे सांगत आहेत.
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूकिसाठी भाजपने ऐनवेळी ठेकेदार असलेल्या समाधान अवताडेना उमेदवारी दिली असून त्यांच्या मागे आ.प्रशांत परिचारक यांची ताकद उभा केली आहे. अवताडे – परिचारक यांची ताकद एकत्र झाल्याने 1 लाख 60 मतांची बेरीज झाल्याचे परिचारक यांनी प्रचारात सांगितले असले तरी दोन्ही उमेदवारांची 2019च्या निवडणुकीतील मतांची बेरीज केली असता ती 1 लाख 30 हजार 550 एवढी होते. यामध्ये भाजपचे तत्कालीन उमेदवार सुधाकरपंत परिचारक यांना पडलेली 76 हजार 426 मते आणि अपक्ष उमेदवार समाधान अवताडे यांना पडलेली 54 हजार 124 मते समाविष्ट आहेत.
या मताचा विचार केला असता 2019 साली भाजप उमेदवार असलेल्या परिचारक यांच्या सोबत शिवसेना पक्ष होता. शिवाय मंगळवेढा येथील राहुल शहा गट, नगराध्यक्षा अरुणा माळी, नगरसेवक अजित जगताप, धनगर समाजाचे नेते तानाजी खरात तर पंढरपूर तालुक्यात सहकार शिरोमणी वसंतदादा काळे साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे हेही परिचारक यांच्यासोबत होते. शिवसेनेसह या स्थानिक नेत्यांची मते परिचारक यांच्या एकूण मतांमध्ये समाविष्ट होती. मात्र या निवडणुकीत शिवसेना, कल्याणराव काळे, राहुल शहा गट, नगराध्यक्षा अरुणा माळी, अजित जगताप गट, तानाजी खरात हे राष्ट्रवादी सोबत आहेत. त्यामुळे त्यांची मते अवताडे परिचारक यांच्या बेरजेतून कमी होणार आहेत.
शिवाय 2019 साली तटस्थ असलेले काँग्रेसचे नेते ऍड.नंदकुमार पवार, बळीराजा पतसंस्थेचे प्रमुख दामोदर देशमुख यांनी यावेळी भगीरथ भालके यांच्या पाठीशी आपली शक्ती लावली आहे. 2019 च्या निवडणुकीत अपक्ष लढलेले धनश्री परिवाराचे प्रमुख प्रा.शिवाजी काळूनगे यांना 7 हजार 232 मते मिळाली होती. त्यांनीही यावेळी भगीरथ भालके यांचा प्रचार केला आहे. त्यामुळे त्यांना मानणारा मतदार यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूला वळणार आहे. यावरून मागील वेळी भारत भालके यांना मिळालेल्या 89 हजार 787 मतांमध्ये यावेळी शिवसेना, राहुल शहा, शिवाजी काळूनगे आणि इतर नेत्यांना मानणाऱ्या मतांची बेरीज होणार आहे.
तर मागील वेळी समाधान अवताडे यांच्या सोबत असलेल्या जेष्ठ नेते बबनराव अवताडे यांच्या गटाच्या मतांची मोठी वजाबाकी होणार हे निश्चित आहे. अपक्ष लढत असलेल्या सिद्धेश्वर अवताडे यांनी 20 हजार मतांचे लक्ष ठेवले असले तरी त्यांना किमान 8 ते 10 हजार मते पडतील असे मानले जात आहे. यावरून त्यांना 2019 साली मिळलेल्या 54 हजार 124 मतांमधून किमान 8 ते 10 हजार मते कमी होण्याची शक्यता आहेत. एकंदरीत परिचारक आणि अवताडे यांच्या एकूण मतांमधून शिवसेना, बबनराव अवताडे, राहुल शहा, तानाजी खरात, जगताप, माळी यांच्या समर्थकांची किमान 30 ते 40 हजार मतांची वजाबाकी होणार असल्याचे निश्चित आहे. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस साठी मात्र बेरजेचे गणित जुळवण्यात यश आले असून शिवसेना, शहा, धनश्री परिवार, बळीराजा परिवार यांच्या किमान 15 ते 20 हजार मतांची भर पडणे अपेक्षित आहे.
पोटनिवडणूकीत एकूण मतदान 60 टक्के झाले तर झालेल्या 2 लाख 4 हजार हजारांपैकी 90 हजार ते 1 लाखापर्यंत मते भगीरथ भालके यांना मिळू शकतात. आणि भाजपचे उमेदवार समाधान अवताडे यांना 85 ते 90 हजार तर उर्वरित 15 ते 20 मतांमध्ये सिद्धेश्वर अवताडे, अपक्ष शैला गोडसे, स्वाभिमानीचे सचिन शिंदे यांची विभागणी होऊ शकते असा अंदाज राजकीय विश्लेषकातून व्यक्त होत आहेत.
एकूम मतदान 60 टक्के यापेक्षा कमी झाले तरी सर्वच उमेदवारांच्या मतांमध्ये घट होण्याची शक्यता असून त्यामुळे भालके आणि अवताडे यांच्या मतांमधील अंतर कमी होईल.
एकट्या भालके यांची वोट बँक 85 ते 90 हजार मतांच्या आसपास असल्याचे 2009, 2014 आणि 2019 साली सिद्ध झालेले आहे. त्या बेसवर भगीरथ भालके यांना किमान 85 ते 90 हजार मते मिळतील असे मानले जाते. यासोबतच शिवसेना आणि इतर स्थानिक नेत्यांची साथ मिळत असल्याने भगीरथ भालके यांच्या मतांची बेरीज कमी होण्याचा धोका अल्प आहे. मात्र परिचारक आणि अवताडे यांच्या मतांची बेरीज वजाबाकीत जात असून समाधान अवताडे यांच्या विजयाचे गणित तिसऱ्या वेळी सुद्धा चुकण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
2019 साली 103 पैकी 47 गावात एकटे भालके, परिचारक आणि अवताडे पेक्षा लिडवर
पंढरपूर -मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात भारत भालके यांचा सर्वत्र कमी अधिक प्रभाव होता, आजही आहे. मात्र परिचारक यांचा मंगळवेढा तालुक्यात आणि अवताडे यांचा पंढरपूर तालुक्यात फारसा प्रभाव नव्हता. त्यामुळे दोन्ही तालुक्यातील मतांची एकून बेरीज भालके यांच्यासाठी विजयाचे गणित जुळवून आणत होती. आता परिचारक – अवताडे यांची बेरीज जरी 1 लाख 30 हजार होत असली तरी मतदारसंघात 103 गावांपैकी 47 गावांत एकटे भालके हे अवताडे, परिचारक यांच्या पेक्षा आघाडीवर होते.
उर्वरित 56 गावांपैकी कुठं अवताडे तर कुठं परिचारक आघाडीवर होते. पंढरपूर शहरातील परिचारक आणि अवताडे यांची एकत्रित मते भालके यांच्यापेक्षा केवळ 794 एव्हडी जास्त होतात. तर पंढरपूर च्या 22 पैकी कासेगाव, गाडेगाव, वाखरी, रांजनी, बोहाळी अशा मोठ्या 6 गावात एकट्या भालके यांची मते अवताडे, परिचारक यांच्या एकत्रित मतांपेक्षा जास्त होती, 2 गावात दोघांच्या एकूण मताएवढी होती.
भालके यांच्या पेक्षा मंगळवेढा शहरात अवताडे आणि परिचारक यांच्या एकूण मतांची बेरीज 8 हजार 391 एवढी जास्त आहे, मात्र त्यामध्ये आता सिद्धेश्वर अवताडे विभागणी करणार आहेत आणि शिवसेना, शहा सोबत इतर गट भालके यांच्या मदतीला येणार आहेत. मंगळवेढा ग्रामीण भागात परिचारक – अवताडे यांना 27 हजार 518 मते अधिक आहेत. मात्र सिद्धेश्वर अवताडे यांची उमेदवारी आणि शिवसेनेसह इतर स्थानिक नेत्यांची मते परिचारक, अवताडे यांच्यापासून बाजूला जात असल्याने एकूण मतांमध्ये बेरीज होते की वजाबाकी यावरच अवताडे यांचे भवितव्य अवलंबून आहे.