माझ्यापर्यंत कसलीही चर्चा नाही : जयंत पाटलांचे स्पष्टटीकरण
पंढरपूर : ईगल आय मीडिया
पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार उभा राहणार असल्याची सूरु झालेली चर्चा बिनबुडाची असल्याचे पक्षातूनच बोलले जात आहे. तर कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलताना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांनी या संदर्भात पक्षात कसलीही चर्चा झालेली नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांमुळे आज दिवसभर सुरू असलेली पार्थ पवार यांच्या उमेदवारीची चर्चा बिनबुडाची आणि पार्थ पवार तसेच पवार कुटुंबाची बदनामी करण्याचे षडयंत्र असल्याचे बोलले जाऊ लागले आहे.
राष्ट्रवादी चे आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनानंतर पंढरपूर ची विधानसभेची जागा रिक्त झालेली असून लवकरच या जागेसाठी पोटनिवडणुक होणार आहे. या जागेवर भालके कुटुंबातील व्यक्तीलाच उमेदवारी द्यावी अशी संपूर्ण मतदारसंघात जोरदार मागणी आहे. भालके यांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी, तसेच त्यानंतर खा. शरद पवार हे सांत्वन दौऱ्यावर आले असता त्यांच्या समोरही हजारो लोकांनी भालके कुटुंबातच उमेदवारी द्यावी अशी मागणी केलेली आहे.
यासंदर्भात कोल्हापूर येथे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट शब्दात शक्यता फेटाळली आहे. मी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आहे, माझ्या पर्यंत अजून ही चर्चाच आलेली नाही. अशा शब्दात पार्थ संदर्भात सुरू असलेली चर्चा निरर्थक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. शिवाय पवार कुटुंबाने अद्याप या संदर्भात कधीही भाष्य केले नाही की खुद्द पार्थ पवार, अजित पवार यांनीही या संदर्भात अवाक्षर उच्चारलेले नाही.
भालके यांच्या निधनाने संपूर्ण मतदारसंघात च नाही तर जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे, त्यांच्या विषयी आणि भालके कुटुंबविषयी सहनुभूतीची मोठी लाट असून या लाटेत आपला निभाव लागणार नाही हे ओळखून भालके यांच्या पारंपरिक प्रतिस्पर्धी असणाऱ्यांनी सुध्दा पोट निवडणुकीत न उतरण्याचा निर्णय खाजगीत बोलून दाखवला आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी दिवसभरात पंढरपूर मधून पार्थ पावर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याच्या बातम्या विविध वृत्त वाहिन्यांवर, यू ट्यूब चॅनेल्सवर चालू आहेत.
खा.शरद पवारांनी सरकोली येथे हजारो कार्यकर्त्यांसमोर बोलताना ” वेगळं काही होणार नाही ” असे स्पष्टपणे सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर पार्थ पवारांच्या नावाची सुरू झालेली चर्चा बिनबुडाची असल्याचे पक्षातूनच बोलले जात आहे. तसेच पार्थ पवार आणि पवार कुटुंबियांच्या बदनामीचाही हा एक भाग असल्याचे बोलले जाऊ लागले आहे.