पंढरपूर तालुक्यातील राष्ट्रवादी मतभेदाने बेजार

सर्वसमावेशक आणि परिपक्व नेतृत्वाचा अभाव

पंढरपूर : ईगल आय मीडिया

अंतर्गत मतभेदांमुळे विधानसभा पोटनिवडणुकीत पराभूत व्हावे लागल्यानंतर पंढरपूर शहर आणि तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस ची अवस्था दरदिवशी केविलवाणी होऊ लागली आहे. पक्षातील प्रमुख नेते आणि पदाधिकारी यांच्यातील मतभेद वाढीस लागले आहेत. तालुक्यात येणाऱ्या प्रत्येक नेत्यासमोर या मतभेदांचे प्रदर्शन होत असून या मतभेदांमुळे आगामी निवडणुकांत राष्ट्रवादीचे पुरते पानिपत अटळ असल्याचे मानले जात आहे.

पंढरपूर तालुका हा राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि पक्षाचे अध्यक्ष खा.शरद पवार यांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र आ.भारत भालके यांच्या अकाली निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी चे उमेदवार भगीरथ भालके यांना अगदी निसटत्या फरकाने पराभूत व्हावे लागले. तरीही भालके यांना मिळालेल्या 1 लाख 5 हजार मतांमुळे या मतदारसंघात राष्ट्रवादी आणि दिवंगत आम. भारत भालके यांचा करिश्मा कायम असल्याचे अधोरेखित झाले आहे.

दरम्यान, विधानसभा पोटनिवडणुकी अगोदरच राष्ट्रवादी मधील गटबाजी उघडकीस आली होती आणि ती कमी झालीच नाही. निवडणुकीत अनेक पदाधिकऱ्यांनी पक्ष विरोधी काम केल्याचा आरोप केला जात आहे. तर भगीरथ भालके यांनी आम्हाला अजिबात विश्वासात घेतले नाही, मनमानी पद्धतीने प्रचार यंत्रणा राबवली, त्यांच्या अहंकारामुळे पक्षाला पराभूत व्हावे लागले, असा आरोप दुसऱ्या गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून होत आहे.

विधानसभा पोटनिवडणुकीनंतर नेत्यांमधील हे मतभेद वाढतच गेलेले आहेत. ते एवढे वाढले आहेत की हे नेते आता एकमेकांची तोंडे सुद्धा पाहण्यास तयार नाहीत. पक्षाचे कार्यक्रम ज्या-त्या गटाच्या सोयीनुसार होऊ लागले आहेत. राज्यस्तरीय नेत्यांसमोर एकमेकांची उणिदुनि काढली जाऊ लागली आहेत. पक्ष म्हणून एकसंधपणा इथे औषधाला ही सापडत नाही. शुक्रवारी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासमोर पुन्हा एकदा मतभेद आणि वाद वितंडाचे प्रदर्शन झाले. अगदी एकमेकांचे बाप काढण्यापर्यंत पदाधिकाऱ्यांची मजल गेली. यामुळे पालकमंत्री सुद्धा व्यथित होऊन निघून गेले.

या पार्श्वभूमीवर आगामी पंढरपूर, मंगळवेढा नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, विठ्ठल सहकारी, सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना निवडणुकीत पक्षाचे धिंडवडे निघणार असल्याचे भाकीत आतापासूनच केले जात आहे.

पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने दिलेली कडवी लढत पाहून निराश झालेल्या विरोधी परिचारक आणि अवताडे गटात मात्र राष्ट्रवादी मधील हे वाद आणि मतभेद पाहून पुन्हा नवा उत्साह संचारु लागला आहे. पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यात राष्ट्रवादी ला एकसूत्रता देईल असे नेतृत्व दिसत नाही. 1 लाख 5 हजार मते मिळवून वाढलेल्या अपेक्षा भगीरथ भालके यांच्याकडून मातीमोल होताना दिसत आहेत. कल्याणराव काळे यांच्यामागे सगळे पदाधिकारी एकसंघ होतील असेही दिसत नाही.

दिवंगत भारत भालके आणि राजूबापू पाटील यांच्या निधनाने पक्षात सर्वसमावेशक आणि परिपक्व नेतृत्वाचा अभाव दिसतो आहे. आ. परिचारक आणि अवताडे यांच्याशी टक्कर देईल असे नेतृत्व राष्ट्रवादी कडे नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत पक्षाची अवस्था कशी असेल याची चिंता कार्यकर्त्यातून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!