मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्यावतीने धम्म यात्रेचे आयोजन
पंढरपूर : प्रतिनिधी
धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे यांच्या वतीने नागपूर दीक्षाभूमी येथे धम्म यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. हि धम्म यात्रा रविवारी पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील हजारो बौद्ध बांधवांना घेऊन नागपूरकडे रवाना झाली. या धम्म यात्रेची सुरुवात पंढरपूर येथील सारनाथ बुद्ध विहार येथे मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या हस्ते पुष्पहार घालून त्रिसरण पंचशील ग्रहण करून अभिवादन करून करण्यात आली.
मनसे नेते दिलीप धोत्रे यांना पक्षाकडून विधानसभेची उमेदवारी जाहीर झालेली आहे. त्यामुळे धोत्रे यांनी निवडणूक प्रचाराचा धुरळा उडवला आहे. यापूर्वी मंगळवेढा येथे भव्य मनसे केसरी कुस्ती स्पर्धा घेतली. तसेच हजारो मुस्लिम बांधवांना घेऊन अजमेर शरीफ दर्गाह यात्रेचे आयोजन केले होते. याशिवाय नवरात्र महोत्सव काळात देवदासी, आराधी, तृतीय पंथी यांचा मेळावा घेऊन त्यांना साडी, चोळी, उपवासाचे पदार्थ वाटप केले आहे. याशिवाय महिला बचत गट आणि महिला उद्योजक यांच्या साठी मनसे ने येत्या दिवाळी काळात फूड फेस्टीव्हल आयोजित केलेला आहे. या फेस्टीव्हल मध्ये मोफत २०० स्टॉल मनसे कडून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे सध्या सर्वत्र दिलीप धोत्रे आणि मनसेची चर्चा सुरू झालेली आहे.
भारतीय राज्यघटनेचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ साली आपल्या लाखो अनुयायांना सोबत घेऊन नागपूर येथील दीक्षाभूमी येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. हा दिवस धम्मचक्र परिवर्तन दिन म्हणून बौद्ध समुदायामध्ये महत्त्वपूर्ण आणि आदरणीय मानला जातो. तेव्हापासून १४ ऑक्टोबर रोजी देशभरातील लाखो बौद्ध बांधव नागपूर येथील दीक्षाभूमी येथे अभिवादन करण्यासाठी जातात. या धम्मचक्र परिवर्तन दिनाचे औचित्य साधून मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या संकल्पनेतून धम्म यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या धम्म यात्रेत पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील हजारो बौद्ध बांधवांनी सहभाग नोंदवून नागपूरकडे रवाना झाले.