कमळ नको,पाठिंबा हवाय !

पराभवाच्या भीतीने कमळ चिन्हावर लढण्याबाबत इच्छुकांची ना-राजी

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूकित भारतीय जनता पक्षाकडून कोण निवडणुकीत उतरणार याकडे लक्ष लागले असून उमेदवारांना भाजपचा पाठिंबा हवाय मात्र कमळ चिन्ह नको अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तर भाजपचा आग्रह कमळ।चिन्हावर च लढावे असा असल्याने उमेदवारी अद्यापही निश्चित झालेली नाही.

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिवंगत आमदार भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात भाजपचा उमेदवार कोण असेल याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, भाजपकडून काही इच्छुकांनी चाचपणी केली आहे. त्यामध्ये दामाजी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समाधान अवताडे यांचे नाव प्रमुख आहे. याशिवाय आम. प्रशांत परिचारक यांच्या परिवारातील एखादा उमेदवार असावा यासाठीही भाजपकडून चाचपणी केली जात आहे. मात्र अद्याप तरी परीचारकानी आपले पत्ते ओपन केले नाहीत. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीची उत्सुकता कायम आहे.

दुसऱ्या बाजूला भाजपकडून समाधान अवताडे यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगली आहे. अवताडे हे राष्ट्रवादी च्या नेत्यानाही भेटून आल्याची चर्चा आहे. मात्र राष्ट्रवादी कडून भालके यांची उमेदवारी निश्चित असल्याने अवताडे यांनी भाजपकडून चाचपणी सुरू केली असल्याचे सांगितले जाते.

नुकतीच अवताडे यांची भाजपच्या वरिष्ठ नेत्याशी चर्चा झाली आहे. मात्र लोकांमध्ये भाजपविषयी नाराजी असून कमळ या चिन्हावर निवडणूक लढवणे अडचणीचे ठरेल हे ओळखुन अवताडे यांनी भाजप पुरस्कृत उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

भाजपच्या घटक पक्षाच्या उमेदवारीवर वेगळे चिन्ह घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी अवताडे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र भाजप च्या नेत्यांनी लढायचे असेल तर कमळ चिन्हासह अशी अट घातल्याचे समजते. यावरून अवताडे यांची कोंडी झाली आहे.

त्यामुळे भाजपकडून ऐनवेळी परिचारक गटाचा उमेदवार भाजपकडून रिंगणात उतरवला जातो की, अवताडे यांना भाजप पुरस्कृत करणार की, अवताडे अखेरच्या क्षणी कमळ चिन्हावर लढण्यास राजी होणार ? यावर निवडणुकीची समीकरणे अवलंबून आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!