भगीरथ भालके यांनाच उमेदवारी द्या !


राष्ट्रवादी पदााधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाची प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांकडे मागणी

पंढरपूर : ईगल आय मीडिया


पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके यांनाच देण्यात यावी यासाठी पक्षाकडे सर्व स्तरातून आग्रही मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर आज ( रविवारी ) उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या दौऱ्याकडे मतदारसंघाचे लक्ष लागले आहे. भगीरथ भालके यांच्यापेक्षा अधिक सक्षम उमेदवार पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडे नसल्याचे दिसत आहे.


पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर होत असलेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीची उमेदवारी कुणाला मिळते याकडे लक्ष लागले आहे. पक्षाकडून श्रीमती जयश्री ताई भालके आणि भगीरथ भालके यांच्यापैकी एकास उमेदवारी दिली जाणार असल्याचे निश्चित आहे. मात्र एकूणच मतदारसंघात भगीरथ भालके यांनाच उमेदवारी मिळावी अशी आग्रही मागणी सर्व स्तरातून होत आहे.

श्रीमती भालके यांच्या प्रमाणेच भगीरथ भालके यांनाही लोकांची पसंती आहे, सर्व सामान्य नागरिकांतून भगीरथ भालके यांच्याबद्दल आकर्षण आहे, भगीरथ भालके यांचे वक्तृत्व दिवंगत आम भालके यांची आठवण करून देते. त्यांच्या प्रमाणेच भगीरथ भालके हे सतत लोकांच्या संपर्कात, सुख दुःखात सहभागी होत असतात. गेल्या 4 महिन्यात भगीरथ भालके यांनी वडिलांच्या निधनाचे दुःख बाजूला सारून अडचणीच्या काळात एका बाजूला विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम पार पाडला, तसाच दुसऱ्या बाजूला मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न केले आहेत. मंगळवेढा तालुक्यातील 35 गावची उपसा सिंचन योजना, संतांची मंजूर असलेली स्मारके, रस्त्याचे प्रश्न सोडवण्यासाठी शासकीय पातळीवर अथक प्रयत्न केले आहेत.

लोकांच्या अडीअडचणीत धावून जात आहेत. युवकांशी त्यांचा चांगला संवाद असून जेष्ठांमध्ये भारत नानांचा मुलगा म्हणून मोठी आपुलकी असल्याचे दिसून आले आहे. शिवाय गेल्या 10 वर्षात झालेल्या नगरपालिका, जिल्हा परिषद, लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भगीरथ भालके यांनी मोठी भूमिका पार पडलेली आहे.

त्यामुळे एक सर्वच बाबतीत सक्षम आणि लोकांची पसंती असलेला उमेदवार म्हणून भगीरथ भालके यांनाच उमेदवारी मिळावी अशी सर्व सामान्य नागरिकांची भावना आहे. गेल्या 5 महिन्यात अनेकवेळा सर्व कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या वरिष्ठांकडे भगीरथ भालके यांच्याच उमेदवारी ची मागणी केलेली आहे. शनिवारी तालुकाध्यक्ष विजयसिंह देशमुख यांच्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचे एक शिष्टमंडळ प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे भगीरथ भालके यांनाच उमेदवारी द्यावी अशी मागणी करण्यासाठी गेले होते.

तर मतदारसंघात ही सामान्य नागरिकांची हीच अपेक्षा असल्याचे चित्र आहे. मात्र पक्ष श्रेष्ठींच्या मनात नेमकं काय आहे. पक्षातील बंडाळी नेते कशा प्रकारे मोडून काढतात, सर्व पदाधिकाऱ्यांना कशा प्रकारे कामाला लावतात याकडेही आता मतदारसंघातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!