त्याचबरोबर राष्ट्रवादीपुढं भाजपचे तगडे आव्हान
पंढरपूर : ईगल आय मीडिया
ज्या शेतकऱ्यांच्या मजबूत पाठिंब्यावर 2019 ला सत्ता मिळाली त्याच शेतकऱ्यांची बिला पोटी वीज कपात केली, शहरात वाढलेल्या कोरोना मुळे लॉक डाऊन चा बडगा उगारला आणि शेत मालाचे दर कोसळले. लॉक डाऊन च्या भीतीने सर्व सामान्य नागरिक ही हवालदिल झालेला आहे आणि अशातच भाजप ने धूर्त चाल खेळत एकास एक उमेदवार देण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे सुरुवातीला आम. भारत भालके यांच्या निधनानंतर सोपी वाटणारी पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेससाठी कठीण होऊ लागली आहे.
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूकीसाठी राष्ट्रवादीची उमेदवारी भगीरथ भालके यांना मिळणार असल्याचे निश्चित झाले आहे. तर भाजपची उमेदवारी समाधान अवताडे याना जाहीर झाली आहे. आ. प्रशांत परिचारक यांना यावेळी निवडणुकीत अवताडे यांच्या विजयासाठी लढण्याची वेळ आली आहे.
अवताडे आणि परिचारक गटाची राजकीय ताकद एकत्र करून राष्ट्रवादी काँग्रेसला हरवण्याची रणनीती भाजपने आखली आहे. पुढच्या काळात या दोन्ही गटांचे मनोमिलन कसे आणि किती प्रमाणात होते त्यावर निवडणूक निकाल अवलंबून आहे.
दुसऱ्या बाजूला निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेसने दिवंगत भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना उमेदवारी निश्चित करुन सहानुभूतीच्या आधाराने ही जागा कायम राखण्याचे धोरण आखले आहे. मात्र गेल्या 15 दिवसांपासून मतदारसंघात सुरू वीज बिल वसुली आणि त्यापोटी केलेली वीज कपात शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण करीत आहे. ऐन उन्हाळ्यात वीज कपात झाल्याने पिके जळू लागली आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांतुन संताप व्यक्त होत आहे.
त्याच बरोबर गेल्या महिन्याभरापासून वाढत्या कोरोनामुळे लॉक डाऊन चा बडगा उगारला गेला आहे. त्यामुळे शेत मालाचे दर वेगाने कोसळले आहेत आणि शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शिवाय शहरातील हातावर पोट असलेल्या सामान्य नागरिकांना ही आपल्या रोजी रोटीचा प्रश्न भेडसावू लागला आहे. कोरोना परिस्थिती आणि लॉक डाऊन याबाबत सरकारच्या धरसोड धोरणामुळे शेतकरी आणि सामान्य नागरिक संतप्त आहेत. यावर सरकारने सर्वांना सोयीचा मार्ग काढावा आणि लॉक डाऊन टाळावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
पोटनिवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस असून उद्या राष्ट्रवादी आणि भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल होतील. तत्पुर्वी राष्ट्रवादीचे अघोषित उमेदवार भगीरथ भालके यांनी सहकुटुंब निवडणूक प्रचारात आघाडी घेतली आहे.
मात्र राज्य सरकारविरोधात तयार होत असलेले जनमत, शेतकऱ्यांची वाढीस लागलेली नाराजी, महाविकास आघाडीतील घटक पक्षांची बंडखोरी, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे थकीत एफ आर पी बिल अशा अन्य काही मुद्द्यांवर राष्ट्रवादी ची कोंडी होऊ शकते आणि भाजप या निवडणुकीत मोठे आव्हान उभा करू शकते.