पंढरपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ !


पक्षाची घडी बसवणाऱ्या तालुका अध्यक्षालाच पदावरून हटवले

विधानसभा पोट निवडणुकीच्या तोंडावर पक्षात धुमशान


पंढरपूर : ईगल आय मीडिया


पंढरपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भूकम्प झाला असून प्रतिकूल परिस्थितीत पक्षाची धुरा खांद्यावर घेऊन पक्षाची घडी बसवणाऱ्या तालुकाध्यक्ष ऍड.दीपक पवार यांना पक्षाने कोणतीही पूर्व कल्पना न देता पदावरून काढून टाकले आहे. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांतुन नाराजी पसरली आहे. अनेक पदाधिकारी राजीनामे देण्याच्या तयारीत असल्याचे समजते.

मला बदलले आहे, हे सोशल मीडियावर समजले
दरम्यान, पदावनत करण्यात आलेले तालुकाध्यक्ष ऍड.दीपक पवार यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता त्यांनी, मला याबाबत कसलीच कल्पना नाही, सोशल मीडियावर दुसऱ्या निवडीचे फोटो आणि मजकूर पाहिल्या नंतर मलाही समजले. याबाबत सध्या तरी काही बोलू इच्छित नाही, असे सांगितले.


पंढरपूर तालुका हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता,परंतु पक्षातून मोठे नेते बाहेर गेल्यानंतर तालुक्यात पक्ष पोरका झाला होता. अशा वेळी जेष्ठ नेते दिवंगत राजूबापू पाटील यांच्या सोबत पंढरपूर तालुक्यात ऍड.दीपक पवार यांनी राष्ट्रवादी ची धुरा समर्थपणे सांभाळली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली सांगोला विधानसभा मतदारसंघात समाविष्ट भागात ग्रामपंचायत निवडणूकितही पक्षाला चांगले यश मिळाले होते.

माढा लोकसभा आणि विधानसभा तसेच पंढरपूर विधानसभा मतदारसंघात पक्षाला बळकट करण्यासाठी त्यांनी आता प्रयत्न सुरू केले होते. आगामी जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणूक लक्षात घेऊन त्यांनी पक्षाचे पदाधिकारी नियुक्त केले होते आणि नवीन शाखा काढण्याचे नियोजन सुरू होते. मात्र आज ( रविवार, दि.28 फेब्रुवारी ) अचानक सोशल मीडियावर पंढरपूर तालुकाध्यक्ष पदी कासेगाव येथील विजयसिंह देशमुख यांची निवड केल्याचे फोटो व्हायरल झाले.

विशेष म्हणजे पक्षातील एकाही पदाधिकाऱ्यांस या बदलाची कल्पना नव्हती. त्यामुळे ज्याला हे वृत्त समजले त्या प्रत्येकाने आश्चर्य व्यक्त केले आहे. विधानसभा पोट निवडणूक तोंडावर आलेली असताना पक्षाने हा बदल करून निष्ठावान आणि सक्रिय कार्यकर्त्यांनाही चक्रावून सोडले आहे. मात्र या निर्णयाविरोधात कार्यकर्ते वरिष्ठांकडे दाद मागणार असल्याचे बोलले जाते.

Leave a Reply

error: Content is protected !!