पंकजा मुंढेंची वाटचाल नाथा भाऊंच्या मार्गे ?

पक्षातील स्थान डळमळीत : राजकारणात निष्प्रभ करण्याचे डावपेच यशस्वी

टीम : ईगल आय मीडिया

दिवंगत नेते गोपीनाथ मुंढे यांच्या कन्या, ओबीसी समाजाच्या नेत्या अशी प्रतिमा असलेल्या माजी मंत्री पंकजा मुंढे यांची कोंडी करण्याचे आणि त्यांचे पंख छाटण्याचे प्रयत्न भाजपातून नियोजनबद्ध पणे सुरु आहेत. आणि हे सगळे दिसत असूनही पंकजा मुंढे काहीही करू शकत नाहीत असेही वास्तव आहे. ज्या पद्धतीने माजी मंत्री एकनाथ खडसे यांना निष्प्रभ करून विधानसभेला हरवण्यात आले आणि त्यानंतर पक्षातून बाहेर जाण्यास भाग पाडले अगदी त्याच पद्धतीने पंकजा मुंढे यांना पक्षात निष्प्रभ करून, त्यांचे पंख छाटून त्यांनाही पक्ष सोडण्यास भाग पाडायची फडणवीस यांचे कारस्थान यशस्वी होत असून पंकजा मुंढे यांची वाटचाल नाथाभाऊ खडसेंच्या मार्गाने सुरु आहे असे दिसून येते. पंकजा बाहेर पडल्या कि मग फडणवीस यांना राज्यात पर्याय उरणार नाही .

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर टीका करणाऱ्यांमध्ये पुढाकार घेणारे एकनाथ खडसे, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर तसेच ‘माधव’ सूत्राच्या माळेतील नेते गोपीनाथ गडावर एकत्रित करण्यात पंकजा मुंडे यांना यश मिळाले होते. ‘हा माझ्या बापाचा पक्ष आहे,’ हे त्यांचे विधान पक्षवर वारसाहक्क सांगणारे होते. भाजपमध्ये ओबीसी मुख्यमंत्री चालत नाही असे म्हणणाऱ्या नाथाभाऊंसारखे बंडाचे शब्द पंकजा मुंढे यांच्या याच काळात देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात पंकजा मुंडे यांच्या मुखी येऊ लागले,त्यांचे समर्थक समाजमाध्यमांवरही व्यक्त होऊ लागले. त्यानंतर बीड जिल्ह्य़ातील वेगवेगळ्या नेत्यांना बळ दिले जाऊ लागले. त्यानंतरच परळी या सुरक्षित मतदारसंघातून निवडणूक लढविणाऱ्या पंकजा मुंडे यांना गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे धनंजय मुंडे यांनी पराभूत केले.

भाजपअंतर्गत वाद आणि लाथाळया विविध माध्यमांतून पुढे येऊ लागल्या. ऊसतोडणी मजुरीबाबत चर्चेसाठी सुरेश धस यांना मेळावे घेण्यासाठी पक्षाने प्रोत्साहन दिले. ते ऊसतोड मजुरांचे नेते आहेत, असे चित्र उभे राहील असे प्रयत्न करण्यात आले. त्याचबरोबर बीड जिल्ह्य़ात येणारा भाजप नेता पंकजा विरोधक आमदार विनायक मेटे यांची आवर्जून भेट घेत असे.यातून पक्षांतर्गत संघर्ष चव्हाटय़ावर येत राहिले. विधान परिषद निवडणुकीच्या वेळी पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळेल अशी आशा त्यांच्या समर्थकांना होती. पण तेव्हा लातूरच्या रमेश कराड यांना पक्षाने बळ दिले. राज्यसभा निवडणूक आली तेव्हा सुद्धा पंकजा मुंढे यांना डावलून भागवत कराड यांना संधी दिली. तेव्हाही मुंडे समर्थक काहीसे नाराज होते.

पंकजा मुंडे यांच्या केंद्रीय कार्यकारिणीतील निवडीनंतर आता केंद्रातून बळ मिळेल अशी आशा होती. पण केंद्रीय मंत्रिमंडळात खा. डॉ. प्रीतम मुंडे यांच्याऐवजी औरंगाबाद येथील डॉ. भागवत कराड यांचे नाव नक्की करण्यात आले. या घडामोडी घडत असताना पक्षीय पातळीवर देवेंद्र फडणवीस यांचा शब्द वरिष्ठ नेते अंतिम मानतात, असा संदेश पपक्षातील फडणवीस विरोधकांपर्यंत झटकन पोहोचला. त्यामुळे चिडलेल्या मुंढे समर्थक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. ते पंकजा मुंडे यांनी फेटाळून तरीही नाराजी लपून राहिली नाही.

नाराजी व्यक्त केल्यानंतर यश मिळण्याऐवजी अपयशच त्यांच्या पदरी पडल्याच्या अनुभव आला आहे. पंकजा मुंडे आणि त्यांच्या नाराज समर्थकांना समजावून सांगण्यासाठी भाजपमधील कोणताही नेता मुंढे यांच्या मुंबईतील निवासस्थानी फिरकला नाही. काही जणांनी मूक होऊन मजा बघितली तर काही जणांनी मीडिया समोर पंकजा यांच्या बाबत चार शब्द खर्ची घालून विषय सोडून दिला.

या प्रकारे भाजपमध्ये आता पंकजा पर्व प्रभावी राहिलेले नाही हे स्पष्ट झाले असून फडणवीस यांच्या रणनीतीनुसार फासे पडत आहेत आणि पंकजा मुंढे त्यात गुंतत चालल्या आहेत. काही दिवस शांत राहतील,पुन्हा एखादा झटका बसला की पुन्हा नाराजी , अधून मधून चिडचिड करतील आणि मिळेल त्या पदावर शांत राहतील. किंवा पक्ष सोडून जातील. अशी नेपथ्य रचना फडणवीस आणि त्यांच्या कंपूने केली आहे, हे मात्र दिसून येत आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!