म्हणाल्या, ‘पवार साहेब…हॅट्स ऑफ !‘
पंकजा मुंढे यांचे चर्चित ट्विट
टीम : ईगल आय मीडिया
खान्देशातील जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजप सोडून अद्याप एक आठवडा झालेला नाही, तोवरच माजी मंत्री आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिवा पंकजा मुंढे यांनी ‘पवार साहेब, हॅट्स ऑफ !’ अशा प्रकारचे ट्विट केले असून याबरोबरच भाजपच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांत भाजपने ऊस तोड मजुरांच्या प्रश्नी आ. सुरेश धस यांच्या खांद्यावर जबाबदारी दिल्याने पक्षात पंकजा मुंढे यांची कोंडी केली जात असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंढे यांचे हे ट्विट भाजपला ‘ईशारा’ असल्याचे मानले जात आहे.
भाजपमध्ये बहुजन नेत्यांची कोंडी करून त्यांना पक्षाबाहेर पडण्यास भाग पाडले जात आहे असे चित्र निर्माण झाले आहे. एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये छळ झाल्याचा आरोप करून 40 वर्षांचे पक्षाचे जनुकीय संबंध तोडून राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या नंतर पंकजा मुंढे यांच्याही नाराजीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.
पंकजा मुंढे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला, त्यानंतर त्यांना विधानपरिषदेत घेतले जाईल अशी अपेक्षा असताना डावलण्यात आले आणि पक्षात नव्यानेच आलेल्या पडळकर, मोहिते -पाटील यांना संधी दिली. एवढंच नाही तर बीड जिल्ह्यातील त्यांचेच समर्थक मानले जाणारे सुरेश धस यांना ताकद दिली जाऊ लागली आहे.
गेल्या काही महिन्यापासून पंकजा मुंढे आणि सुरेश धस यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत आणि दुरावा वाढला आहे. त्याचबरोबर पंकजा मुंढे ज्या ऊस तोडणी मजुरांचे नेतृत्व करतात त्या ऊस तोडणी मजुरांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्याची जबाबदारी भाजपने धस यांना दिली आहे. त्यामुळे पंकजा यांना बीड जिल्ह्यात नवीन स्पर्धक तयार केला जात असल्याचे दिसून येऊ लागले आहे. या पार्श्वभूमीवर नाराज असलेल्या पंकजा मुंढे यांनी मंगळवारी खा. शरद पवारांचे कौतुक करणारे ट्विट केल्याने भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे.