बारामतीत परीचारकांची बी टीम शरद पवारांच्या भेटीला

मंगळवेढ्यात परिचारक आणि भगीरथ भालके एकाच मंचावर

पंढरपूर ; प्रतिनिधी

शनिवारी माजी आम प्रशांत परिचारक यांची बी टीम समजले जाणारे अत्यंत विश्वासू नेते बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस एस पी गटाचे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या भेटीला गेले होते. तर इकडे मंगळवेढा येथे प्रशांत परिचारक आणि पवारांचे संभाव्य उमेदवार भगीरथ भालके एकाच मंचावर होते. या दोन्ही राजकीय घटनांमुळे पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे राजकारण उत्कठावर्धक स्थितीत आले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पंढरपूर, मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील राजकीय घडामोडी वेगवान झालेल्या आहेत. पडद्या आड आणि समोर ही रोज काही ना काही घटना घडत आहेत. शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष सुभाष भोसले आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांची पंढरपुरात भेट झाली, बंदद्वार चर्चाही झाली. तर शनिवारी सुभाष भोसले यांच्यासह परिचारक यांचे निष्ठावान, विश्वासू आणि परिचारक गटाच्या कोअर कमिटी चे सदस्य माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसाट, रा. पां कटेकर, संजय अभ्यंकर हे बारामतीत खासदार शरद पवार यांच्या भेटीला गेले होते.

पवारांनी परिचारक समर्थक नेत्यांना अर्धा तास वेळ दिला आणि मतदार संघातील बारीक सारीक घटनांची माहिती घेतली. संभाव्य उमेदवारांची नावे विचारून घेतली. यावेळी सुभाष भोसले यांनी पवाराना आपणही निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे बोलून दाखवले. तर परिचारक समर्थकांनी पण भोसले यांच्या नावाची शिफारस केली, असे सांगण्यात आले. त्यावेळी पवारांनी भोसले आणि परिचारक समर्थक मंडळींना चकित करणारे वक्तव्य केल्याचे ही समजते. परिचारक समर्थक जेव्हा बारामतीत पवारांच्या सोबत चर्चा करीत होते तेव्हा मंगळवेढा येथे प्रशांत परिचारक आणि भगीरथ भालके एकाच मंचावर होते.

तुम्हाला मागेच सांगितलें होते, नगरपालिकेच्या बाहेर पडा
माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले यांनी विधानसभा निवडणुकी साठी उमेदवारीची मागणी करताच शरद पवार म्हणाले की, बघु, आणखी वेळ आहे, तुम्हाला मी मागेच सांगितले होते की नगरपालिकेतील बाहेर पडा, तुम्ही पडला नाहीत. पवारांच्या या वाक्याने भोसले यांच्यासह परिचारक समर्थक ही अवाक झाले. कारण सुभाष भोसले यांनी नेहमीच केवळ पंढरपूर नगरपालिका, पंढरपूर शहर यापुर्तेच राजकारण पाहिले. त्यांचा शहराबाहेर कसलाच संपर्क नाही, हे पवारांनी भोसले यांना सुनावले होते.

विशेष म्हणजे यावेळी भालके आणि परिचारक अगदी खुर्चीला खुर्ची लावून जवळ बसले होते. यावेळी परिचारक यांचा सत्कार करण्यात आला. त्यामुळे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात नेमकं काय चाललं आहे याविषयी प्रचंड उत्कंठा वाढली आहे. परिचारक थेट राष्ट्रवादीत प्रवेश करून उमेदवारी घेतात की भगीरथ भालकेना पाठींबा देतात, की स्वतंत्र लढून आणखी एकवेळ निवडणुकीचा राजकीय जुगार खेळतात याकडे लक्ष लागले आहे.

होय, आम्ही शनिवारी बारामती मध्ये खा. शरद पवार यांना भेटलो, यावेळी आम्ही आमचे मित्र असणाऱ्या सुभाष दादा भोसले यांच्यासाठी पंढरपूर मधून उमेदवारीची मागणी केली. यावेळी पवारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच तालुक्यातील राजकीय परिस्थिती विचारली, प्रशांत परिचारक यांच्या विषयी ही विचारणा केली. लक्ष्मण शिरसाट, माजी नगराध्यक्ष परिचारक समर्थक

Leave a Reply

error: Content is protected !!