काकांना शह देणारा पुतण्याचा पाहणी दौरा

काकांच्या राजकीय फेरजुळणीला पुतण्याकडून कोलदांडा


पंढरपूर : ईगल आय मीडिया

मागील महिन्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी पंढरपूरचा दौरा केला. त्यानंतर ज्या काही राजकीय घडामोडी पडद्याआडून घडल्या, त्यांना शह देणारा दौरा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी केला. त्यामुळे काकांच्या राजकीय फेरजुळणीला शह देण्यासाठीच अजित पवारांचा दौरा होता की काय, अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे.

व्हीडिओ पहा आणि चॅनेल subscribe करा


29 सप्टेंबर रोजी खा. शरद पवार यांनी पंढरपूरचा सांत्वन दौरा केला. यावेळी त्यांनी कै. सुधाकपंत परिचारक, राजूबापू पाटील आणि हभप रामदास महाराज कैकाडी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर पवारांच्या इशाऱ्यावर इशाऱ्यावरच जिल्ह्यातील काही राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी आणि घर वापसीच्या चर्चाही झाल्या. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यासाठी थोरल्या पवारांच्या मर्जीतल्या काही नेत्यांना पक्षात पुन्हा येण्यासाठी दूतही पाठवले. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद ही मिळाल्याचे समजते. मात्र बहुतेकांची अडचण समान होती ती म्हणजे, ‘अजितदादांचं काय करायचं ?’


सोलापूर जिल्ह्यातील थोरल्या पवारांची टीम मजबूत आणि निष्ठावान होती. मात्र धाकल्या पवारांनी आपले प्रस्थ वाढवण्याच्या प्रयत्नात काकांच्या टीममधील एकेक खेळाडू आउट करायचा प्रयत्न केले. त्यामुळे जिल्ह्यातील काकांचे निष्ठावंत सहकारी अजितदादाच्या करस्थानाला कंटाळून भाजपमध्ये गेले. कुणी थेट गेले तर कुणी बघ्याची भूमिका घेऊन पक्ष विरोधी काम केले. यातून पक्षाचेच नुकसान झाले आणि जिल्हा परिषद गेली, जिल्ह्यातील आमदारांची संख्या 5 वरून 3 वर आली. तर दुसऱ्या बाजूला अजित दादांची बेभरवशी टीम मात्र भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत ‘मॅच फिक्सिंग’ करण्यात आपले ‘ हित ‘ शोधत होती.

या राजकीय पार्श्वभूमीवर थोरल्या काकांना पुन्हा आपले जुने खेळाडू संघात घ्यायचे आहेत मात्र त्या खेळाडूना ‘धाकल्या पवारांचं काय करायचं?’ असा प्रश्न पडला आहे.

खा. पवारांनी आपल्या दौऱ्यात जी काही राजकीय फिल्डिंग लावली होती, ती विस्कटण्याचा प्रयत्न अजितदादांनी केला असल्याचे दिसते. कारण काकांनी ज्यांच्या परतीसाठी प्रयत्न फिल्डिंग लावली होती त्यांनी परतीचा विचार करू नये अशाच पद्धतीने काल धाकल्या पवारांनी खेळी केली.

कालचा अजितदादांचा दौराच सुरू झाला तो आ. संजय शिंदे यांच्या फार्म हाऊसवर जेवण करून. तिथून संजय शिंदे अजितदादांच्या दौऱ्यात पंढरपूर तालुक्यात मिरवत आले ते अखेरपर्यंत सोबत होते. अजित दादांनी भोसे, पटवर्धन कुरोली येथे भेटी दिल्या त्यावेळी आ. संजय शिंदे यांच्यासह आ.बबनदादा शिंदे, आम. भारत भालके ही उपस्थित होते. विशेष म्हणजे खा. पवारांच्या दौऱ्यात आ. संजय शिंदे अनुपस्थित होते. तर पंढरपूर येथे अजितदादांच्या सोबत आ. संजय शिंदे यांनी परीचारकांच्या वाड्यावर, दुर्घटना ग्रस्त घाटावर ही हजेरी लावली. एवढंच नाही तर कासेगाव इथं पाहणी करण्यासाठी जातानाही आ. संजय शिंदे उपस्थित होते.

ज्या संजय शिंदे यांच्यामुळे जिल्ह्यातील मोहिते – पाटील, बागल गट दुरावला त्याच शिंदे यांना घेऊन अजितदादांचे जिल्ह्यात फिरणे थोरल्या काकांच्या फेरजुळणीला धावबाद करण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. दूर गेलेल्या खा. पवारांच्या माणसांनी पुन्हा पक्षात येऊ नये अशाच प्रकारे अजितदादांच्या राजकीय हालचाली सुरू असतात. त्यामुळे मागील महिन्याच्या दौऱ्यात चुलत्यानी जी राजकीय फिल्डिंग रचली तीच उध्वस्त करण्यासाठी अजितदादांचा शनिवारचा दौरा होता काय अशी चर्चा आता जिल्ह्यात सुरू झाली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!