परिचारक खरेच भाजप सोडतील ?

जीव इथं रमत नाही, तरीही पक्ष सोडणं जमत नाही

भाजपमध्ये आ. परीचारकांची मनस्थिती काय आहे याची कल्पना छायाचित्रावरून येते.


पंढरपूर : ईगल आय मीडिया


विधानपरिषद सदस्य प्रशांत परिचारक हे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणार असल्याच्या वावड्या अधून – मधून उडत असतात. परंतु, गेली 5 ते 6 वर्षे भाजपची साथ सांगत करणारे परिचारक खरेच भाजप सोडतील का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. गेल्या वर्षभरात किंबहुना त्यापूर्वी पासूनच भाजपची साथ – संगत परिचारकाना फारशी आवडलेली नाही. मात्र राजकीय अपरिहार्यतेमुळे त्यांना भाजपची साथ सोडता येत नाही. त्यांची आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची भाजपमध्ये घुसमट होत असली, तिथे जीव रमत नाही, आणि भाजप सोडणे जमत नाही, अशी एकूण परिस्थिती निर्माण झाली आहे.

पंढरपूर तालुक्यातील एकूणच राजकारण आणि राजकीय नेत्यांवर काँग्रेस, राष्ट्रवादी, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार यांचा प्रभाव राहिला आहे, एखाद्या-दुसऱ्या निवडणुकीत जरी वेगळा निकाल लागला तरीही, जनता काँग्रेस – राष्ट्रवादी विचारापासून दूर गेली नाही आणि नेते मंडळी यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार यांच्यासोबतच राहिली आहे.


या पार्श्वभूमीवर पंढरपूर तालुक्यात गेल्या 10 वर्षांपासून अगोदर स्वाभिमानी शेतकरी संघटना, नंतर भाजपने पाय रोवण्याचे प्रयत्न केले. मात्र ते या पक्षाना ही जमले नाही. लोकांची मानसिकता पाहून नेते मंडळीनी थेट पक्षात जाण्याऐवजी आजवर त्याचा पाठिंबा घेऊनच अपक्ष निवडणुकीला सामोरी गेले आहेत. 2019 साली उघडपणे भाजपची उमेदवारी घेऊन जेष्ठ नेते , दिवंगत सुधाकरपंत परिचारक यांनी निवडणूक लढवली. मात्र त्यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.

सध्या प्रशांत परिचारक जरी आमदार असले तरी तो त्यांचा स्वतःचा करिश्मा आहे, भाजपचा टेकू नावालाच होता. त्यानंतर मागील 6 वर्षात उघडपणे परिचारक यांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला नव्हता. सर्व निवडणुकीत आघाडी करून आपले स्वतंत्र अस्तित्व ही जपले होते. सहकारी संस्था, निष्ठावंत कार्यकर्त्यांचे मजबूत संघटन याच्या जोरावर परिचारक राजकिय दृष्टीने भाजपच्या संगतीने टिकून राहिले. मात्र त्यांनी उघडपणे भाजप प्रवेश केला नव्हता. त्यांचे कार्यकर्ते गेल्या 6 वर्षात कोणत्याही राजकीय पदाशिवाय राहिले मात्र भाजपची पदे घेतली नव्हती. प्रशांत परिचारक यांची नाळ राष्ट्रवादीशी जोडली आहे,

2009 नंतर इथे आ. भारत भालके यांनी मांड ठोकली आणि परीचारकाना सत्तेच्या वर्तुळाबाहेर पिंगा घालावा लागला.मात्र, नुकतेच आ. भारत भालके यांचे निधन झाले आणि रिक्त झालेल्या जागेसाठी परिचारक राष्ट्रवादी कडे प्रयत्न करीत असल्याची चर्चा सुरू झाली. 13 फेब्रुवारी रोजी नान्नज येथे खा. शरद पवार यांच्या कार्यक्रमात उमेश परिचारक दिसले, त्यावरून पुन्हा राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चेला सुरुवात झाली. परीचारकांनीही कधी या चर्चेला पूर्णविराम द्यायचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे ही चर्चा वाढत गेली.

दरम्यान च्या काळात भाजपचे राज्यातील सर्वे सर्वा देवेंद्र फडणवीस यांनी भालके यांच्या निधनानंतर 20 दिवसात सरकोली ची वाट धुंडाळत परीचारकाना तुमच्याशिवाय पर्याय आहेत असा अप्रत्यक्षपणे ईशारा दिला होता. त्यानंतर मात्र आ. परिचारक यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपची पदे घेतली, परिचारक भाजपच्या आंदोलनासाठी रस्त्यावर दिसू लागले. मुंबई, दिल्लीत भाजपच्या नेत्यांना भेटू लागले. या सगळ्या गाठी भेटीच्या वेळी, आंदोलन स्थळी परीचारकांची देहबोली, कार्यकर्त्यांची कुजबुज वेगळीच चालू असते. ‘जीव इथं रमत नाही, बाहेर पडणं जमत नाही,’ असा एकूण माहोल परिचारक यांच्या गोटात सध्या आहे.


लवकरच विधानसभा पोटनिवडणुक होत आहे, या निवडणुकीत आ.परिचारक यांच्यातील कुणी उतरण्याची शक्यता नाही. सध्या त्यांची शहरातील तयारी नगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन सुरू आहे. राज्यातील राजकीय वातावरण बदलले नाही तर मात्र 2024 च्या निवडणुकीत कदाचित परिचारक भाजपचे निशाण सोडतील असे मानले जाते. तूर्तास तरी आणखी 4 वर्षे त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्याना जीव रमत नसला तरीही भाजप मध्येच रहावे लागणार असे दिसते.

Leave a Reply

error: Content is protected !!