पुणे पदवीधर : भाजपचे संग्राम देशमुख तर राष्ट्रवादी चे अरुण लाड ?

सांगली जिल्ह्यातील तुल्यबळ उमेदवार : निवडणूक होणार रंगतदार

टीम : ईगल आय मीडिया

पुणे पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने क्रांतीअग्रणी जी डी बापू लाड यांचे वारसदार अरुण लाड यांना उमेदवारी देण्याचे ठरवले असून भाजपने सांगली जि प चे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख यांना उमेदवारी देत महाविकास आघाडीला पहिला धक्का दिला आहे. यामुळे या निवडणुकीतील चुरस प्रचंड वाढली आहे. राष्ट्रवादीच्या वतीने पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि क्रांती उद्योग समूहाचे प्रमुख अरुण लाड यांनाच उमेदवारी जवळपास निश्चित झाली असून सांगली जिल्ह्यातील असणाऱ्या या दोघांत जोरदार लढत होणार आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघातून शेखर चरेगावकर, राजेश पांडे, माणिक पाटील, रोहन देशमुख, सचिन पटवर्धन, मेघा कुलकर्णी, प्रसेनजित फडणवीस यांच्यासह अनेकांची नावे चर्चेत होती. पांडे यांचे नाव अखेरच्या क्षणापर्यंत आघाडीवर होते. परंतु भाजप नवीन पर्यायाच्या शोधात होते. देशमुख हे सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील दोनवेळा या मतदार संघातून विजयी झाले आहेत. त्यामुळे पक्षाची हॅट्रिक करण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. यामुळे दोन प्रदेशाध्यक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सध्या ही जागा महाविकास आघाडीच्यावतीने लढवताना ती राष्ट्रवादीला मिळणार असून लाड यांची उमेदवारी निश्चित आहे. यामुळे ही निवडणूक आता लाड आणि देशमुख यांच्यात होण्याची चिन्हे आहेत.

सांगलीसह कोल्हापूर, सोलापूर व सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीने चांगली बांधणी केली आहे. यामुळे ही निवडणूक रंगतदार होणार आहे. गेल्या निवडणुकीत सारंग पाटील आणि लाड या राष्ट्रवादीच्या दोन उमेदवारात मतांची विभागणी झाल्याने आमदार चंद्रकांत पाटील यांचा निसटता विजय झाला होता. यामुळे यावेळी बंडखोरी होऊ नये यासाठी राष्ट्रवादीचे नेते काळजी घेत आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!