भाजपमध्ये काम होईना : धाकटे पवार दाद देईना
पंढरपूर : ईगल आय मीडिया
राष्ट्रवादी चे अध्यक्ष शरद पवार हे मंगळवारी पंढरपूर तालुक्याच्या धावत्या दौऱ्यावर होते. सुमारे वर्षभराने पवार तालुक्यात आले असल्याने त्यांच्या मागे 3 ते 4 डझन वाहनांचा ताफा होता. याच वाहनांच्या गर्दीत भाजपचे नेते कल्याणराव काळे यांनीही आपला टांगा दामटला. मात्र पवारांच्या गर्दीत ते दुर्लक्षितच राहिले. अखेरीस धावत- पळत हेलिपॅडवर जाऊन काळे यांनी पवारांना गाठले. आणि आपले गाऱ्हाणे मांडले.
कधी काँग्रेस, तर कधी शिवसेना असा राजकीय प्रवास करीत कल्याणराव काळे यांचा राजकीय टांगा सध्या भाजपच्या तबेल्यात विश्रांती साठी थांबलेला आहे. गेल्या वर्षी ‘जय श्रीराम’चा जयघोष करीत प्रवाहासोबत चला म्हणून कल्याणराव काळे भाजपच्या लाटेवर स्वार झाले. संस्था अडचणीत आहे, भाजप शिवाय पर्याय नाही, इथे (काँग्रेसमध्ये) कोण दखल घेत नाही , आमदार आपापली कामे करून घेतात अशा तक्रारी करीत काळे भाजपमध्ये गेले. मात्र तिथेही त्यांची कुणीच दखल घेतली नाही. कारखान्यासाठी मुंबई – दिल्ली हेलपाटे मारूनही कारखान्याच्या आर्थिक अडचणी कायम आहेत.
दरम्यानच्या काळात खा. पवारांनी राजकीय चमत्कार घडवून भाजपचा प्रवाह अडवला. त्यामुळेच सत्तेच्या प्रवाहात असलेले काळे , महाडिक, पाटील, मोहिते – पाटील आता समस्यांच्या डबक्यात अडखळले आहेत. भाजपमध्ये मेळ बसेना आणि राज्यात पुन्हा काँग्रेस, राष्ट्रवादी सत्तेत आल्याने इकडे परत येणे अडचणीचे झाले आहे. या राजकीय अगतीकतेतून सुटका करून घेण्यासाठी पुन्हा कल्याणराव काळे यांनी थोरले पवार, धाकटे पवार, जयंत पाटील यांचे उंबरठे झिजवण्यास सुरुवात केली आहे.
थोरल्या पवारांचा मनात असूनही धाकटे पवार काही दाद देईनात म्हणून काम काही मार्गी लागेना. अडचणीतून बाहेर पडण्यासाठी कल्याणराव काळे यांनी हरतर्हेनें प्रयत्न सुरू केले आहेत. थोरल्या पवारांना पटवल्याशिवाय आपले काम होत नाही, हे लक्षात आल्याने कल्याणराव काळे यांनी त्यांचा पिच्छा पुरवला आहे.
बुधवारी खा. पवार येत आहेत हे समजताच काळे यांनी थेट टेम्भुर्णी गाठली आणि तिथूनच पवारांच्या गर्दीत आपला टांगा घुसवला. मात्र पवार आले होते ते राजूबापू पाटील, सुधाकरपंत परिचारक आणि हभप रामदास महाराज यांच्या घरी सांत्वन करायला. त्यामुळे त्या ठिकाणी आपले म्हणणे मांडणे योग्य नाही याचे भान राखून काळे यांनी पवारांच्या नजरेत येईल अशा बेताने आपला टांगा त्यांच्या गर्दीत दामटलाच. भाजपचे कल्याणराव आपल्या गर्दीत कसे काय ? असा प्रश्न एकमेकांना विचारत राष्ट्रवादी चे पदाधिकारी काळे यांच्याकडे अचंबित होऊन बघत होते. अखेरीस काळे यांनी हेलिपॅडवर जाऊन पवारांना गाठले आणि आपले गाऱ्हाणे त्यांच्या कानी घातले. यावेळी पवारांनी तिथूनच संबंधितांना फोनही केला. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने काळे दिवसभराची दमछाक विसरून हेलिपॅडवरून परतल्याचे दिसून येते.
आता येत्या आठवड्यात जलसंधारण मंत्री जयंत पाटील सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. त्यावेळी तरी आपला प्रश्न मार्गी लागेल या अपेक्षेने काळे जयंत पाटलांची वाट पाहत आहेत असेही समजते. मात्र मंगळवारी आणि बुधवारी दिवसभर पंढरपूर तालुक्यात चर्चा रंगली होती ती म्हणजे पवारांच्या गर्दीत भाजपच्या कल्याणरावांचा टांगा कसा काय म्हणूनच.