शिंदे परिवाराचे पंख छाटणारे “हात” कोणाचे ?

सोलापूर जिल्हा काँग्रेस मध्ये शिंदेंच्या पर्यायाची चाचपणी

पंढरपूर : ईगल आय मीडिया

माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय गृहमंत्री, आंध्रप्रदेशचे राज्यपाल ते अनेक वर्षे काँग्रेसच्या महत्वाच्या पदावर राहिलेले राज्यातील काँग्रेसचे बडे नेते अशी ओळख असलेल्या सुशीलकुमार शिंदे यांना काँग्रेस मध्ये पर्याय शोधला जात असल्याचे दिसते. एकेकाळी देशपातळीवर मोठे नाव असलेल्या,काँग्रेस मध्ये शब्दाला मान असलेल्या शिंदे कुटुंबाला डावलून त्यांच्याच जिल्ह्यात पर्याय शोधला जात असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे एरव्ही शिंदे समर्थक म्हणून त्यांच्या आगे-पिछे फिरणाऱ्या एकाही समर्थकांकडून यासंदर्भात आवाज उठवला जात नाही, आणि खुद्द शिंदे कुटुंबाने ही थांबा आणि पहा अशी भूमिका घेतल्याचे चित्र आहे. त्यामुळे आगामी काळात सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे काय होणार, आणि शिंदे साहेबांचे पंख छाटणारे ‘हात’ कोणाचे ? अशी विचारपूस काँग्रेस कार्यकर्त्यांतून सुरू आहे.

संबंधित बातमी वाचा !

सुशीलकुमार शिंदे देशपातळीवर आणि आ. प्रणिती शिंदे राज्यपातळीवर मोठा प्रभाव असलेले नेते आहेत. सुशीलकुमार शिंदे काँग्रेस हाय कमांड सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय मानले जात होते तर आ.प्रणिती शिंदे यांनी शिंदे साहेबांची लेक या परिघाबाहेर जाऊन आपला प्रभाव कामातून निर्माण केला आहे. त्यामुळेच त्या सलग तीन वेळा विधानसभेत निवडून गेल्या आहेत. दरम्यानच्या काळात गेल्या 2 वर्षात सुशीलकुमार शिंदे यांचे पंख छाटण्याचे प्रयत्न वरपासून खालीपर्यंत सुरु असल्याचे दिसून आले.

काँग्रेस पक्षाच्या अनेक राज्याचे प्रभारी, पक्षाचे सरचिटणीस अशी पदे असलेल्या शिंदे यांना गेल्या वर्षभरात काँग्रेस पक्ष संघटनेत बेदखल करण्यात आले आहे. साध्या काँग्रेस कार्यकारिणीत ही शिंदे यांना स्थान दिलेले नाही. तर दुसऱ्या बाजूला राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये तीन वेळा निवडून आलेल्या प्रणिती शिंदे यांची निवड होईल असे मानले जात असताना त्यांचा पत्ता कट झाला. त्यांचा बरोबर किंवा त्यांच्या नंतर विधानसभेत पोहोचलेले काहीजण मंत्री म्हणून मिरवत असताना सभागृहात आणि बाहेरही प्रभावी कामगिरी असलेल्या प्रणिती शिंदे यांना मात्र जाणीवपूर्वक डावलण्यात आले आहे.

शिंदे परिवारास डावलून निर्णय घेईल असा प्रदेश पातळीवर सध्या एकही नेता नाही. तरीही त्यांना डावलले जात आहे, याचा अर्थ सलग दोन वेळा लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्याने दिल्ली दरबारी शिंदे यांचे महत्व कमी झाले असल्याचे मानले जाते. सोलापूर जिल्हाच नाही तर लगतच्या विजापूर, गुलबर्गा या कर्नाटकी जिल्ह्यात ही शिंदे यांचा काही प्रमाणात प्रभाव होता. मात्र आता त्यांच्या शब्दाला सोलापूर जिल्ह्यात ही सन्मान राहिलेला नाही असे दिसते.

गेल्या महिन्यात सोलापूर जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्ष पदाची निवड शिंदे यांना विश्वासात न घेताच केल्याचे दिसून आले. शिंदे समर्थक प्रकाश पाटील ( पाणीवकर ) यांना हटवून माळशिरस तालुक्यातील धवलसिंह मोहिते – पाटील यांची वर्णी जिल्हाध्यक्ष म्हणून लावण्यात आली. मोहिते पाटील यांच्या निवडी मागे लातूरकर देशमुख यांचा हात असल्याचे बोलले जात आहे. तसेही देशमुख आणि शिंदे कुटुंबाचे सौहार्दाचे संबंध असताना आणि राजकीय ‘काटमारी’ चा इतिहास नसतानाही देशमुखांनी सोलापूर मध्ये तेही शिंदे यांच्या विरोधात हस्तक्षेप कसा काय केला असा सवाल उपस्थित केला जात आहे.

धवलसिंह मोहिते -पाटील यांची निवड शिंदे समर्थकांना तर रचलेली नाहीच खुद्द शिंदे बाप-लेकिच्या ही पचनी पडलेली नाही असे दिसून आले. धवलसिंह मोहिते -पाटील जिल्हाध्यक्षपदाचा पदभार घेते वेळी आ.शिंदे यांच्यासह त्यांचे बहुतेक समर्थक गैरहजर होते. गेल्या 20 वर्षात सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसचा प्रभाव, अपवाद वगळता सीना नदीच्या पलीकडेच मर्यादित झालेला आहे. आज त्या भागात ही काँग्रेसच्या एकमेव आमदार प्रणिती शिंदे आहेत आणि सोलापूर महानगरपालिकेत काँग्रेसचे अस्तित्व शिंदे कुटुंबामुळे आहे. असे असताना सोलापूर शहर आणि जिल्ह्यात आजही काँग्रेसला टिकून रहायचे असेल तर शिंदे कुटुंबाशिवाय पर्याय नाही.

सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस कडे दुसरा सक्षम उमेदवार ही नाही, अशी राजकिय वस्तुस्थिती असताना काँग्रेस पक्षाकडून खुद्द शिंदे यांनाच पर्याय शोधला जात आहे असे दिसते. याचा परिणाम आगामी महानगरपालिका, जिल्ह परिषद, पंचायत समिती निवडणुकीत दिसून येईल असे बोलले जाते. शिंदे कुटुंबाचे सध्याचे मौन आगामी निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवातून व्यक्त होईल असे ही बोलले जाते. सध्या काँग्रेस कार्यकर्ते शिंदे यांचे पंख छाटणारे’ हात ‘ कोणाचे आहेत ? याचा विचार करीत आहेत असे दिसते.

Leave a Reply

error: Content is protected !!