खा.शरद पवार यांची घेतली भेट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
पंढरपूर : प्रतिनिधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विश्वासू, निकटच्या गोटातील शिवसेनेचे नेते अशी खास ओळख असलेले येथील उद्योजक राजू खरे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्ग पवार पक्षाचे प्रमुख खा.शरद पवार यांची भेट घेतली. मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघातून खरे हे ‘तुतारी’ घेऊन लढणार असल्याच्या चर्चांना या भेटीने बळ मिळाले असून प्रस्थापित नेतेमंडळींसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
पंढरपूरची १७, उ. सोलापूरची २४ गावे आणि मोहोळ तालुका मिळून हा मतदारसंघ बनलेला आहे. गेल्या तीन निवडणुकीत या ठिकाणी ऐनवेळी बाहेरचा उमेदवार देऊन राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळविला आहे. मात्र, बाहेरच्या, गेटकेन उमेदवारांमुळे मतदारसंघ विकासापासून वंचित राहिल्याचा मुद्दा उपस्थित करीत राजू खरे यांनी गेल्या दोन-तीन वर्षांपासून जोरदार रान उठवले आहे. कोणत्याही परिस्थितीत या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्धार करून जोरदार तयारी चालविली आहे.
या अंतर्गत अनेक वर्षांच्या शिवसेनेतील संबंधांचा फायदा घेत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आ.भरतशेठ गोगावले, खा. संदीपान भुमरे यांच्या माध्यमातून विविध योजनांमधून मतदारसंघात कोट्यावधींचा निधी खेचून आणला. याच बरोबर स्वखर्चाने ‘मागेल त्याला रस्ता, मागेल त्याला पाणी’ तसेच शिक्षण, आरोग्य विषयक सुविधा उपलब्ध करण्याचा धडाका लावला आहे. दुष्काळी परिस्थितीत त्यांनी तब्बल ७० दिवस अनेक गावांना स्वखर्चातून टँकरने पाणी पुरविले. गावोगावी, वाडीवस्तीवर जनतेच्या जिव्हाळ्याची कामे पोहोचल्याने खरे यांच्यासाठी एक वेगळा माहौल मतदारासंघात तयार झाला आहे.
सामाजिक समतोल साधण्याचा प्रयत्न मोहोळ राखीव मतदारसंघात बौद्ध समाजाचे मतदार मोठ्या प्रमाणावर आहेत.मात्र, गेल्या तीन निवडणुकीत या समाजाला उमेदवारी दिली गेली नसल्याची खंत आणि कमालीची अस्वस्थता व्यक्त होत आहे. चळवळीतील कार्यकर्ते असलेल्या खरे यांच्या रूपाने खा. पवार ही अस्वस्थता दूर करतील, असे या भेटीनंतर जाणकारांमधून चर्चिले जात आहे
दरम्यान, महायुतीत मोहोळची जागा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला सुटणार हे निश्चित असल्याने विद्यमान आ.यशवंत माने यांनी प्रचार सुरू केला आहे. या प्रकारामुळे सर्व विरोधकांसह खरे समर्थकांमध्ये अस्वस्थता होती. त्यातूनच खरे यांनी महाविकास आघाडीतून खा.शरद पवार यांच्या पक्षाच्या ‘तुतारी’ चिन्हावर ही निवडणूक लढवावी, असा आग्रह समर्थक, कार्यकर्त्यांनी धरला होता. यासंदर्भात अनेक बैठकाही पार पडल्या होत्या. अनेक नेतेमंडळी खरे यांच्याशी संपर्क साधत होते.
मोहोळ मतदारसंघात राजू खरे यांनी मोठे काम करून वेगळी ओळख निर्माण केली आहे. याची दखल राष्ट्रवादीने घेतल्याचे बोलले जात होते. त्यातूनच प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील, जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे यांच्यासह वरिष्ठ नेतेमंडळींनी खरेे यांच्या नावाला ‘ग्रीन सिग्नल’ दिल्याचे समोर येत आहे. अखेर या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून खरे यांची पक्षाध्यक्ष खा.शरद पवार यांच्याशी भेट घडली. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला ‘चितपट’ करण्यासाठी स्वत: खा.शरद पवार यांनीच हा डाव टाकल्याची चर्चा होत आहे.
अखेर मंगळवारी खरे यांनी खा. शरद पवार यांची भेट घेतली. मतदारसंघात आजवर केलेल्या कार्याचा अहवाल सुपूर्द केला. खा. पवार यांनी तब्बल ३५ मिनिटे वेळ देत खरे यांच्याशी विविध विषयांवर सकारात्मक चर्चा केली. या भेटीची छायाचित्रे सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने संपूर्ण मतदारसंघात चर्चेला उधाण आले. एकीकडे विद्यमान आमदार मानेे यांच्यासह अनेकजण ‘तुतारी’ हाती घेण्यास आतूर असल्याच्या चर्चा असताना खरेे यांनी खा. पवार यांची भेट घेतल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या.