बिहार निवडणुकीच्या तोंडावर भोजपुरी अभिनेत्याचा पक्षात प्रवेश
सुदीप पांडे याचा भोजपुरी सिनेमा चांगलाच गाजला होता
टीम : ईगल आय मीडिया
गेल्या ही महिन्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फिल्मी सिताऱ्यांचे सुरू असलेले इन्कमिंग सुरूच असून मंगळवारी भोजपुरी अभिनेता सुदीप पांडे यांनी पक्षात प्रवेश केला. पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई प्रदेश कार्यालयात पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस खा. प्रफुल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत भोजपुरी सिनेअभिनेते सुदीप पांडे आणि दीपा पांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील, कोषाध्यक्ष हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे हजर होते.
कोण आहेत सुदीप पांडे ?
सुदीप पांडे हे मूळ बिहारचे असून त्यांनी अनेक भोजपुरी, हिंदी सिनेमात नायक म्हणून काम केले आहे. भोजपुरी चित्रपटांची निर्मितीसुद्धा त्यांनी केली असून भोजपुरी सिनेमातील आघाडीचे अभिनेते आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीत त्यांचा पक्षाला स्टार प्रचारक म्हणून फायदा होऊ शकतो.
दोन महिन्यांपूर्वी मराठी चित्रपट अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी पक्षात प्रवेश केला असून त्यानंतर मराठी चित्रपटातील अनेक तारे, तारकांनी राष्ट्रवादी काँग्रेसला प्राधान्य दिले आहे. या पार्श्वभूमीवर भोजपुरी अभिनेत्याचा प्रवेश ही पक्षाला मुंबईत परप्रांतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी उपयोगी ठरणार असल्याचे बोलले जाते.