महाविकास आघाडी सरकार मजबूत !

मुख्यमंत्र्यांच्या दसऱ्याच्या भाषणास राष्ट्रवादीसह काँग्रेसचे ही भक्कम समर्थन

टीम : ईगल आय मीडिया

गेल्या 6 महिन्यापासून राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कधीही कोसळेल अशी ‘ कुजबुज ‘ सुरू असतानाच दसऱ्याच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या सडेतोड भाषणाचे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी दिलखुलास स्वागत करून मुख्यमंत्री ठाकरे यांना समर्थन दिले आहे. यावरून जशी कुजबुज सुरू आहे तसे या सरकारमध्ये अंतर्विरोध नाहीत हे समोर आले आहे. तीनही पक्षांनी हे सरकार 5 वर्षे पूर्ण करेल असे ठामपणे बोलून दाखवले आहे आणि आता विरोधी पक्ष भाजपलाच गळती सुरू झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार आणखी मजबूत झाल्याचे मानले जात आहे.

गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीनंतर अकल्पनिय घटना घडल्या आणि शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या 3 पक्षांचे महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले. तीनही पक्षांची विचारधारा, कार्यपद्धती वेगळी असल्याने हे सरकार फार दिवस चालणार नाही, अंतर्विरोधामुळे आपोआप कोसळेल अशी कुजबुज सुरू झाली होती. भाजपने ही अनेकवेळा सरकार पाडण्याचा प्रयत्न चालवला, माध्यमांनी सरकारमधील पक्षांमध्ये, नेत्यांमध्ये मतभेद असल्याच्या बातम्या चालवल्या मात्र हे सरकार अस्थिर असल्याचे दिसून आले नाही. कोरोना, अतिवृष्टी, आर्थिक मंदी अशा कारणांमुळे सरकार समोर अनेक संकटे निर्माण झाली मात्र समन्वयातून हे सरकार पुढे जात असल्याचे दिसून येते.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जे भाषण केले त्यावर भाजपने टीकेची झोड उठवली असली तरी सरकारमधी घटक पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी मात्र अगदी मोकळेपणाने मुख्यमंत्री ठाकरे यांच्या भाषणाचे स्वागत केले आहे. त्यामुळे सरकारमध्ये वैचारिक आणि कृतिशील या दोन्ही आघाड्यावर मतभेद नाहीत हेच स्पष्ट होत आहे. काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी हे सरकार 5 वर्षे पूर्ण करेल, मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलेले भाषण योग्य असल्याचे बोलून दाखवले आहे तर मजबूत असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

तत्पूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पंढरपुरात मुख्यमंत्री ठाकरे यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करून पंतप्रधान मोदी सुद्धा घरातूनच काम करतात असा टोला लगावून ठाकरे यांची जोरदार पाठराखण केली होती.

महाविकास आघाडी सरकार हे किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर चालते, असे स्पष्ट करतानाच कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तीनही पक्ष आपली विचारधारा सोडून सरकारमध्ये सामील झालेले नाहीत, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणाचे समर्थन केले आहे.

शिवसेना विरुद्ध भाजप या दोन पक्षांत जो संघर्ष सुरू आहे त्यात पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी सत्य परिस्थितीचा आरसा भाजपला दाखवला आहे. अनेक आश्वासने देत भाजपकडून जनतेची दिशाभूल करण्याचे काम कसे केले जाते, हे दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी सांगितले. शिवाय राज्यपाल असोत वा भाजप यांच्याबाबत मुख्यमंत्र्यांनी परखड भाष्य केले, असे नमूद करत मलिक यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुकच केले.

दरम्यान, भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला जय श्रीराम करीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे, तसेच निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये गेलेले अनेक नेते परत काँग्रेस, राष्ट्रवादी मध्ये परतण्याचा मानसिकतेत असल्याने भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. यामुळे राज्य सरकार अस्थिर असल्याचा चालवलेला प्रचार फसवा असून महाविकास आघाडी सरकार भक्कम असल्याचेच गेल्या 15 दिवसांत अधोरेखित झाले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!