सुधाकरपंत परिचारक यांच्या दिलदारीचा किस्सा
पंढरपूर : ईगल आय मीडिया
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पंतांच्या पसंतीचे उमेदवार माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांना पराभूत केल्यानंतर आम. भारत भालके एका कार्यक्रमासाठी प्रथमच नगरपालिकेत आले. त्यावेळी परिचारक गटाच्या कार्यकर्त्यांच्या, पालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या मनात ही जखम ताजी होती. त्यामुळे सत्कार करते वेळी आम. भालके यांचा क्रम डावलण्याचा प्रयत्न झाला. हे लक्षात येताच सुधाकरपंत परिचारक यांनी आपला सत्कार नाकारला आणि अगोदर आमदारांचा सत्कार करा असे कार्यकर्त्यांना सुनावले. त्यांच्या या दिलदारीने उपस्थित सर्वजण अवाक तर झालेच मात्र आ भालके हे सुद्धा चकित झाले.
पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात निवडणुकीपूरती खुन्नस असते. पातळी सोडून टीका ही केली जात नव्हती ( अलीकडे ही परंपरा मोडीत काढली जात आहे, हा भाग वेगळा) त्याच बरोबर विरोधकांचा मान, सन्मानही राखला जात असायचा. अगदी भाई राऊळ, बाबुराव जोशी, कर्मवीर औदुंबर अण्णा पाटील यांच्यापासून ते सुधाकरपंत परिचारक यांच्यापर्यंत ही परंपरा पाळली गेली. विद्यमान आम भारत भालके यांनीसुद्धा पंतांच्या वयाचा, त्यांच्या जेष्ठत्वाचा नेहमीच सन्मान राखला आहे. आणि पंतांनी सुद्धा आम भालके यांच्यावर टीका करताना कधीही पातळी सोडली नाही. एवढेच नाही तर राजकीय विरोधक असूनही अनेकवेळा दोन्ही नेते सार्वजनिक कार्यक्रमात एकाच मंचावर, खुर्चीला खुर्ची लावून बसल्याचे तालुक्याने पाहिले आहे. एवढे राजकीय सौहार्द अन्य तालुक्यात अपवादानेच दिसून येईल.
2009 सालची विधानसभा निवडणुक, त्यावेळी झालेला परिचारक गटाचा पराभव आजही नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनात सलतो आहे. मात्र राजकीय जीवनातील एवढा मोठा पराभव पदरात घेऊनही अगदी चार – दोन महिन्यातच पंतांनी आपल्या मनाचा मोठेपणा, लोकप्रतिनिधी पदाचा सन्मान कसा राखावा हे दाखवून दिले.
विधानसभा निवडणुकीनंतर आमदार भारत भालके पहिल्यांदाच एका कार्यक्रमासाठी पंढरपूर नगरपालिकेत आले होते. तेंव्हा तत्कालीन केंद्रिय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. आणि स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून प्रोटोकॉल नुसार आम भालके यांनाही आमंत्रित करावे लागले होते.
नगरपालिकेच्या सभागृहात झालेल्या त्या कार्यक्रमात सत्कार करतेवेळी अगोदर सुशीलकुमार शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्यानंतर जेष्ठ नेते म्हणून सुधाकरपंत परिचारक यांचा सत्कार पुकारण्यात आला. लगेचच पंतांनी निवेदकाला थांबवले आणि ” भारत नानांचा अगोदर सत्कार करा, ते लोक प्रतिनिधी आहेत ” अशा शब्दांत संयोजकांना सूचना केली. आणि आपला सत्कार मागे राखून अगोदर आम. भालके यांचा सत्कार करण्यास भाग पाडले. पंतांच्या या भूमिकेमुळे उपस्थित सर्वच चकित झाले आणि पंढरपूर च्या राजकारनाचे पाणी अजूनही चंद्रभागेच्या पाण्याइतके निर्मळ असल्याची खात्री पटली.
मंगळवारी पंतांचे निधन झाल्यानंतर आमदार भारत भालके यांनी आपल्या फेसबुक पेजवर त्यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करीत पंतांना आदरांजली व्यक्त केली. हे चित्र पंढरीत राजकारणापलीकडे माणुसकी जपली जाते हेच दाखवून देते.
हृदय स्पर्शी….
Khupach sundar. Ashi Rajkiya vicharshakti asavi.