पांडुरंग परिवाराचे नेते वसंतराव देशमुख यांच्या ६१ सोहळ्यात पेरली बंडखोरीचे बीजे
पंढरपूर : eagle eye news
पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष आणि पांडुरंग परिवाराचे जेष्ठ नेते वसंतराव देशमुख यांच्या ६१ च्या सत्कार सोहळ्यात आगामी विधानसभेच्या उमेदवारीची जोरदार चर्चा रंगली. विशेष म्हणजे पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आ. प्रशांत परिचारक यांच्या समक्षच वसंतनाना देशमुख यांना बंडखोरीचे सल्ले मान्यवरांनी दिले. त्यामुळे पंढरपूर तालुक्यात या कार्यक्रमाची चर्चा रंगली आहे.
पांडुरंग परिवाराचे जेष्ठ नेते वसंतराव देशमुख यांचा ६१ वा वाढदिवस मोठ्या उत्साहात कासेगाव येथे संपन्न झाला. या वेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील, जेष्ठ विधिज्ञ ऍड. उज्वल निकम, आ. शहाजी पाटील, आ. रणजितसिंह मोहिते – पाटील, आ. यशवंत माने, माजी आ. राजन पाटील आदींसह राजकीय क्षेत्रातील मान्यवर मंडळी आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना ऍड. निकम यांनी, वसंतनाना देशमुख हे आपल्या राजकीय कारकीर्दीमध्ये भिडस्त स्वभाव घेऊनच वावरलेले आहेत. त्यांच्या स्वभावामध्ये कोणाला नाराज न करण्याची भावना आहे. या भावनेला आता थोडसं बाजूला करून त्यांनी आता निर्भीडपणे राहिलं पाहिजे, आणि वागले पाहिजे तरच त्यांना पुढील राजकीय कारकिर्दीमध्ये प्रगती करता येईल, असा सल्ला दिला.
पांडुरंग परिवारात बंडखोरीची बीजे !
वसंतराव देशमुख हे पांडुरंग परिवाराचे जेष्ठ नेते आहेत, दिवंगत सुधाकरपंत परिचारक आणि विजयसिंह मोहिते – पाटील यांचे विश्वासू अशी त्यांची ओळख आहे. पांडुरंग सहकाराचे उपाध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, पंचायत समिती सभापती अशी महत्वाची पदे त्यांनी भूषवली आहेत. मात्र सुधाकरपंत परिचारक यांच्या पश्च्यात पांडुरंग परिवारात वसंतराव देशमुख यांना अडगळीत टाकण्यात आल्याची भावना त्यांच्या समर्थकांतून व्यक्त होत आहे. आमदारकीची क्षमता असलेल्या वसंतराव देशमुख यांनी आता थांबू नये असा बहुतांश वक्त्यांनी सल्ला दिला. तसेच गावात आणि कासेगाव परिसरात बहुतांश फलकावर भावी आमदार असा उल्लेख करण्यात आलेला होता. काही फलकांवरून चक्क प्रशांत परिचारक याचेच फोटो गायब होते. यावरून पांडुरंग परिवारातील संभाव्य बंडखोरीचीही चर्चा तालुक्यात रंगलेली आहे.
तर आ. शहाजी पाटील म्हणाले की, पंढरपूर तालुक्यांमध्ये विधानसभेसाठी असंख्य लोक इच्छुक असलेले दिसून येत आहेत. पवार साहेबांच्या कडेने रिंगण घालू लागलेले आहेत. आम्ही आमच्या राजकीय जीवनामध्ये शरद पवार यांच्याकडेने असंख्य रिंगण घातले परंतु काय उपयोग झाला नाही. तेथून बाहेर पडलो म्हणून आमदार झालो. तसे आता वसंतनानांनी सुद्धा धाडस केले पाहिजे असा सल्ला दिला.