कल्याणराव काळे, भगीरथ भालके, युवराज पाटील, ऍड.गणेश पाटील यांचा कस लागणार

पंढरपूर : ईगल आय मीडिया
आ. भारत भालके, माजी जि प सभापती राजुबापू पाटील यांच्या अकाली निधनानंतर पोरके दिवस अनुभवत असलेल्या विठ्ठल परिवाराला तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या पहिल्या परीक्षेला सामोरे जावे लागत आहे. परिवाराचे मार्गदर्शक नेते कल्याणराव काळे, युवा नेते भगीरथ भालके, युवराज पाटील, राष्ट्रवादी युवक चे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांच्या नेतृत्वाची या निवडणुकीत कसोटी लागणार आहे. 15 महिन्यांनी होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या दृष्टीने या ग्रामपंचायत निवडणुका अतिशय महत्वाचा मानल्या जात आहेत.
या निवडणुका गाव पातळीवर होणार असल्या तरी गावागावातील कार्यकर्त्यांचे गट तट, मतभेद, गाव पातळीवर आघाड्या, निवडणूक प्रचारातील सुसूत्रता, अडचणी सोडवण्यासाठी नेत्यांची महत्वाची भूमिका राहते आहे, ती भूमिका काळे, भालके, पाटील कशी पार पाडतात यावर परिवाराचे निवडणुकीतील यश अवलंबून आहे. ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच, सरपंच, गावातील गट नेता हीच गाव पातळीवर कार्यकर्त्यांसाठी सन्मानाची पदे असतात, त्यासाठी या निवडणुकीत नेत्यांकडून त्यांना पाठबळ अपेक्षित असते. याच पाठबळावर ते स्थानिक स्वराज संस्था, साखर कारखाने, विधानसभा, लोकसभा निवडणुकीत नेटाने लढतात.
विठ्ठल परिवार हा पंढरपूर तालुक्यात मोठी राजकीय ताकद मानला जातो. परिचारक प्रणित पांडुरंग परिवार आणि भालके, काळे, पाटील गट प्रणित विठ्ठल परिवार यांच्यात गेल्या 20 वर्षात राजकीय संघर्ष होत आला आहे. गेल्या 2 दशकांत या परिवाराचे नेतृत्व आ. भारत भालके, कल्याणराव काळे, राजूबापू पाटील, युवराज पाटील यांनी केले. जि प, पंचायत समितीच्या निवडणुकीत जरी संमिश्र यश मिळाले असले तरीही विधानसभा, लोकसभा, ग्रामपंचायत, सहकारी संस्थांच्या निवडणूकित मात्र विठ्ठल परिवाराने यश मिळवले आहे. त्यामुळे तालुक्यातील विठ्ठल परिवार मोठी राजकीय ताकद असल्याचे सिद्ध झाले आहे.
मात्र गेल्या 4 महिन्यात परिवाराने आ.भारत भालके, राजूबापू पाटील हे दिगग्ज नेते गमावले, त्यामुळे विठ्ठल परिवार पोरका झाला आहे, दोन्ही नेते दोन मजबूत खांब होते, तेच कोसळले असल्याने परिवाराचे घरटे पुन्हा बांधण्याची जबाबदारी कल्याणराव काळे, युवक नेते भगीरथ भालके, युवराज पाटील, ऍड. गणेश पाटील यांच्यावर येऊन पडली आहे. त्यातच आता तालुक्यातील सुमारे 70 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत.
सामान्य कार्यकर्त्याना मान, सन्मान देणाऱ्या निवडणुकीत विठ्ठल परिवाराचे नेते कशा पद्धतीने आपले कौशल्य दाखवतात यावरच विठ्ठल परिवाराची पुढील राजकिय दिशा ठरणार आहे. आणि आ.भालके, राजूबापू पाटील यांच्या निधनानंतर आलेल्या पहिल्याच परीक्षेत कल्याणराव काळे, भगीरथ भालके, युवराज पाटील, गणेश पाटील यांच्या नेतृत्वाकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.