नेत्यांत सुप्त संघर्ष : निवडणुकीत अपयश आणि संस्था डबघाईला
पंढरपूर : ईगल आय मीडिया
‘ कल्याणराव काळे आणि मी वेगळ्या पक्षात असलो तरीही आम्ही विठ्ठल परिवारात आहोत ‘, हे आ. भारत भालके यांचे वक्तव्य राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्वसामान्य नागरिक यांच्या भुवया उंचावणारे आहे. कारण गेल्या 4 वर्षात विठ्ठल परिवाराचे अस्तित्वच शिल्लक राहिले नाही. त्यामुळे तब्बल 4 वर्षांनी आ. भालके यांना विठ्ठल परिवाराची आठवण कशी काय झाली याची चर्चा सुरू आहे.
विठ्ठल परिवार हा पंढरपूर, मोहोळ, माढा विधानसभा मतदारसंघात मोठा राजकीय प्रभाव असणारा परिवार होता. 2012 च्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत परिवाराने आपली ताकद दाखवूनही दिली होती. विठ्ठल परिवारात मुख्यत्वे आ. भारत भालके, कल्याणराव काळे आणि राजूबापू पाटील यांच्या गटाचा समावेश होता. मात्र या तिन्ही नेत्यांच्या राजकिय, सार्वजनिक आणि वैयक्तिकही तऱ्हा तीन प्रकारच्या असल्याने विठ्ठल परिवार कधीही एकसंघ उभा राहिला नाही. परिवारातच नेहमी सुप्त संघर्ष आणि ईर्षा फुलत राहिल्याचे दिसून आले आहे.
2019च्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर आणि माढा या दोन्ही मतदारसंघात परिवाराची कसलीच राजकीय भूमिका नव्हती. तर विधानसभा निवडणुकीत पंढरपूर विधानसभा मतदारसंघात कल्याणराव काळे यांचे कार्यकर्ते आ. भालके यांच्या पराभवासाठी परिचारकांच्या कार्यकर्त्यांपेक्षा जास्त जोर लावत होते. बाजूच्या सांगोला आणि मोहोळमध्ये परिवाराची भूमिका आणखी वेगळीच होती, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत ही विठ्ठल परिवाराचे अस्तित्व दिसलेच नाही. 2017 च्या नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही विठ्ठल परिवाराने आपल्याच उमेदवारांना पाडण्याचे काम इमाने – इतबारे पार पाडले.
विठ्ठल परिवार म्हणून एरव्ही परिवारातील एकाही संस्थेला मदत व्हावी असे काम परिवारातील नेत्यांकडून होत नाही. त्यामुळेच परिवारातील बहुतके सर्व संस्था डबघाईला आल्या आणि काही बंद ही झाल्या आहेत. एकसंघता नाही, निवडणुकीत यश नाही त्यामुळे कार्यकर्ते नाराज, निराश आणि संस्था डबघाईला आल्या त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. विठ्ठल परिवाराचे नेतेच एकमेकांकडे गैर विश्वासाने बघतात तिथे कार्यकर्त्यांचे काय ? अशीही विचारणा कार्यकर्त्यातून होत आहे.
दुसऱ्या बाजूला आर्थिक सक्षम संस्था आणि मजबूत संघटना याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण असणारा आ. परिचारक यांचा पांडुरंग परिवार आहे. त्या तुलनेत विठ्ठल परिवारातील संस्था, संघटना आणि नेत्यांमधील सुसंवाद या सगळ्याच बाबतीत अगदी आनंदी आनंद आहे. त्यामुळे विठ्ठल परिवाराच्या असण्या- नसण्याचे परिवार समर्थक शेतकरी, कार्यकर्ते यांना आता काही सोयरसुतक दिसत नाही.
अशा मजबूत आणि एकसंघ (?) विठ्ठल परिवाराचे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना विस्मरणही झालेले असताना आ. भालके यांना तब्बल 4 वर्षांनी आठवण झाली. लवकरच परिवारातील साखर कारखान्याच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. विठ्ठल सहकारी, सहकार शिरोमणी या साखर कारखान्याच्या निवडणुका एकतर्फी व्हाव्यात यासाठीच विठ्ठल परिवाराचा तंबू पुन्हा उभा केला जात आहे का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.