काही जागांवर अपक्ष ठरणार निर्णायक
पंढरपूर : ईगल आय मीडिया
वाखरी ग्रामपंचायतीच्या 17 जागांसाठी निवडणूक होत असून 3 जागा बिनविरोध झाल्या आहेत तर 14 जागांसाठी 36 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. परिचारक,भालके,काळे या गटांनी आपसात केलेल्या 2 आघाड्यामध्ये दुरंगी लढत असली तरीही काही जागांवर अपक्ष उमेदवार निर्णायक ठरणार असल्याचे दिसत आहे.
वाखरी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आता प्रचार जोरदार रंगला आहे. पांडुरंग परिवार आणि विठ्ठल परिवारातही विभागणी झाली असून एक गटाने विठ्ठल परिवारासोबत आघाडी केली आहे तर दुसऱ्या गटाने शिवसेनेसह विठ्ठल परिवारातील एक गट सोबत घेतला आहे.
मतदानाची तारीख जवळ येत आहे तशी निवडणूक प्रचारातील रंगत वाढू लागली आहे. दिवसा प्रचार फेरी आणि रात्री गाठी भेटी, नाराजांचे रुसवे – फुगवे काढण्याचे काम सुरू आहे. वाखरीत आजवर प्रत्येक निवडणुकीत खेळीमेळीचे वातावरण असते, मतदान झाले की सगळे मतभेद विसरून एकत्र येतात. त्याच पद्धतीने यावेळी सुद्धा निवडणूक प्रचार सुरू असून. चुरस असली तरी निवडणूक प्रक्रिया निर्विवाद आणि शांततेत सुरू असल्याचे दिसते.
अर्ज छाननीत परिचारक, भालके, काळे आघाडीच्या उमेदवाराचा अर्ज अवैध ठरल्याने 1 जागा बिनविरोध झाली तर अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी दोन अर्ज माघारी घेतल्याने संजय अभंगराव आणि उमाबाई जगताप हे दोन उमेदवार बिनविरोध झाले आहेत.
सध्या 14 जागांसाठी 36 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक 2, 4 अपक्ष उमेदवार निर्णायक ठरणार असल्याचे दिसत आहे. तर प्रभाग क्रमांक 2, 4 आणि 5 मधील लढतीकडे संपूर्ण गावचे लक्ष लागले आहे. दोन्ही आघाड्यानी तगडे उमेदवार दिल्याने चुरस वाढली आहे. प्रभाग क्रमांक 1, 5 आणि 6 मध्येही अपक्ष निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.