माझा निर्णय शरद पवार आणि उद्धव ठाकरे घेतील : महेश कोठे
सोलापूर : ईगल आय मीडिया
माझा निर्णय शरद पवार आणि उध्दव ठाकरे घेणार आहेत. मी कोणत्याही पदासाठी इच्छुक नाही. त्यामुळे राष्ट्रवादी किंवा शिवसेनेच्या कोणत्याही जबाबदारी घेण्याच्या प्रश्नच उद्भवत नाही. विनाकारण खोडसाळपणे हे वृत्त प्रसारित करत मला अडचणीत आण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे माजी महापौर महेश कोठे यांनी म्हटले आहे.
मी अद्याप शिवसेनेचा नगरसेवक आहे. माझा निर्णय अद्याप झालेला नाही. मध्यंतरी शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी माझी हाकालपट्टी केली आहे. तसे पत्र प्रसारमाध्यमांना दिले आहे. मी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यावेळी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची माझी मानसिकता होती, ही वस्तुस्थिती आहे. मात्र महाआघाडीतील घटक पक्षातील नेते मंडळींना इतर पक्षात प्रवेश द्यायचा नाही, असा निर्णय झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझा राष्ट्रवादीचा प्रवेश थांबवला होता असे स्पष्टीकरण महेश कोठे यांनी दिले आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये सध्या महेश कोठे यांच्यावरून खलबते चालू आहेत. महेश कोठे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. कोठे यांना राष्ट्रवादीचे शहराध्यक्षपद दिले जाणार असल्याच्या चर्चेने त्यांचा राष्ट्रवादी प्रवेशाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तर तिकडे महेश कोठे यांनी विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांच्या समवेत एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने शिवसेनेमध्ये देखील कोठे यांना मोठी जबाबदारी देणार असल्याचे वृत्त आहे.
महेश कोठे यांनी याबाबत खुलासा केला आहे. मी कोणत्याही पदाला इच्छुक नाही. खोडसाळपणे बातम्या पसरवल्याशा जात आहेत. असा कोणता निर्णय, अथवा चर्चा शरद पवार अथवा एकनाथ शिंदे यांच्याबरोबर झाली नाही. कोणीतरी मला अडचणीत आणण्यासाठी मुद्दाम या खोट्या बातम्या पसरवत आहे. माझ्या प्रवेशासंदर्भात निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आणि खा. शरद पवार घेणार आहेत. असा कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही . त्यामुळे कोणत्याही पदाला इच्छुक असण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, असे स्पष्टीकरण कोठे यांनी दिले आहे.