परिचारकांच्या सत्तेला आव्हान देणार कोण ?

पंढरपूर नगरपालिका निवडणूक प्रक्रिया सुरू

पंढरपूर : ईगल आय मीडिया

राज्य निवडणूक आयोगाने 20 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकाऱ्यांना नगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे नगरपालिका निवडणुका या मुदतीतच होण्याची शक्यता बळावली आहे. या पार्श्वभूमीवर पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत विद्यमान सत्ताधारी परिचारक यांच्या सत्तेला आव्हान कोण देणार ? की निवडणूक एकतर्फीच होणार याविषयी चर्चा रंगली आहे.

कोरोना मुळे बहुतांश निवडणुका पुढे ढकलल्या गेल्यात. त्यामुळे डिसेंबर अखेर मुदत संपणाऱ्या नगरपालिकाच्या निवडणुका मुदतीत होणार की नाही याकडे नागरिकांचे लक्ष लागून होते. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने 20 ऑगस्ट रोजी प्रभाग रचनेसंदर्भात आदेश काढल्याने नगरपालिका निवडणूका मुदतीत होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. त्याअनुषंगाने राजकीय क्षेत्रात तातडीने लगबग सुरू झाली आहे.

इच्छुकांनी अगोदरच तयारी सुरू केली आहे. आता आपल्या सोयीने प्रभाग रचना करून घेण्यासाठी धडपड सुरू होणार आहे. पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत कशा लढती होणार याची आता चर्चा सुरू झाली आहे.

गेल्या साडेसात वर्षांपासून आ.प्रशांत परिचारक यांच्या गटाची एकहाती सत्ता असून 2011 चा अपवाद वगळता दिवंगत आमदार भारत भालके हे सुद्धा परिचारकांच्या सत्तेला आव्हान देऊ शकलेले नाहीत. त्यामुळेच आता त्यांच्या पश्चात नगरपालिका निवडणुकीत परिचारक यांच्यासमोर आव्हान कुणाचे असणार ? याकडे लक्ष लागले आहे.

तालुक्यातील प्रबळ राजकीय गट असलेल्या विठ्ठल परिवारास घरघर लागली असून आज घडीला विठ्ठल परिवार नेतृत्वहीन झाल्याच्या अवस्थेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा शहरात चांगला प्रभाव असला तरी हा पक्ष शहरात अनेक गटात विभागला गेला आहे. भारत भालके यांच्यामागे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये एकसंघपणा उरलेला नाही. काँग्रेस, शिवसेना या पक्षांचे ही शहरात बऱ्यापैकी संघटन असले तरी परिचारक यांच्यासमोर आव्हान उभा करू शकेल अशा नेतृत्वाचा अभाव आहे.

या पार्श्वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि अनेक प्रभागात प्रबळ असणाऱ्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची मोट बांधण्यात विरोधकाना यश येणार का ? यावरच निवडणुकीचे भविष्य अवलंबून आहे. अन्यथा एकसंघ, सर्वार्थाने बलाढ्य असलेल्या परिचारक गटासमोर आगामी निवडणुकीत आव्हानही उभा राहणार नाही, ही निवडणूक एकतर्फी होईल असे आजचे चित्र आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!