फेसबूक, युट्युब चा वापर वाढला
पंढरपूर : सतीश बागल
कोरोनामुळे यंदा आषाढी यात्रेचा पायी दिंडी सोहळा रद्द करण्यात आला. त्यामुळे लाखो वारकरी विठ्ठल दर्शनाची आस मनातच दाबून ठेवत घरी बसलेले आहेत. मात्र घरी बसल्यानंतरही त्यांनी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचा प्रस्थान सोहळा अनुभवला, याची डोळीयानी पाहिला. एवढेच नाही तर पालखी मार्गावरील ठरलेल्या संत मंडळींची कीर्तने, प्रवचनेसुद्धा घरी बसूनच online च्या माध्यमातून पाहत आहेत, ऐकत आहेत. परंपरेचा पाईक असलेला वारकरी नव्या जगात हायटेक झाला असून वारकरी संप्रदायाच्या सर्वसमावेशक तत्वाचे हे दर्शन आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये पालखी सोहळा हायटेक बनला, वाढती गर्दी, वाढत्या अडचणींवर मात करण्यासाठी आधुनिक साधनांचा वापर वाढला आहे. त्याच्या जोडीला इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी पालखी सोहळा घरोघरी पोहचवला आहे. आज बहुतांश वारकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल फोन आला आहे. फेसबुक, यूट्यूबच्या माध्यमातून भजन, प्रवचन ऐकली अन् ऎकवली जात आहेत. आता सोशल मीडियाच्या माध्यमातून लाईव्ह कार्यक्रमही घेतले जात असून त्याचा लाभ वारकरी घेत आहेत. कोरोनामुळे एकूनच परंपरा जपत असतानाच वारीचे स्वरूप बदलत आहे.
बहुतांश देवस्थानांनी आपल्या वेबसाइट बनवून, त्या माध्यमातून लाईव्ह दर्शन तसेच इतर माहिती अपडेट केली आहे. वारकऱ्यांना त्याचा फायदाही होतो आहे. महाराज मंडळींची किर्तने, प्रवचने ही टेलिविज़न वर प्रसारीत केली जातात. युट्युब वर टाकली जात आहेत. महाराज मंडळींच्या नावाने काढलेल्या यूट्यूब चैनल चे लाखो सबस्क्रायबर आहेत.
जेष्ठ पत्रकार सूर्यकांत भिसे यांच्या पुढाकाराने यंदाच्या वारीत पालखी सोहळा पत्रकार संघ व इतर संस्थांकडून लाईव्ह कीर्तन, प्रवाचनाचा कार्यक्रम online घेण्यात येत आहे. सौरभ मोरे, स्वामीराज भिसे यासारख्या तरुण मंडळींनी यापूर्वीच पालखी सोहळा, दिंडी या विषयी फेसबुक पेजेस तयार करून वारी व्हर्चुअल केलेली आहे. तर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून विठ्ठल व रुक्मिणी मातेचे रोजचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले जातात. वारकऱ्यांपर्यंत ते पोहोचत असतात, घरबसल्या त्यांना विठ्ठलाचे दर्शन होते.
गेल्या काही वर्षांमध्ये वारी आणि वारकऱ्यांमध्ये बदल झाल्याचे दिसून येते. केवळ यात्रा, एकादशी या दिवशी पंढरपूरला न जाता इतर वेळ देखील मोठ्या प्रमाणात भाविक हे पंढरीत येत असतात. श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीकडून जिओ टीव्हीवर विठ्ठलाच्या ऑनलाईन दर्शन होते तसेच वेबसाईटवर देखील लाईव्ह दर्शन सुरू असते.
वारीत विठ्ठल दर्शनासाठी येणारा भाविक हा मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातील असतो. यामध्ये वयस्कांची संख्या ही अधिक असते. कोरोनामुळे त्यांच्या आरोग्याची खबरदारी घेणे आवश्यक असल्याने, कोरोना काळात त्यांनी बाहेर न पडणे योग्य आहे. वारकऱ्यांचेही व्हाट्सअप ग्रुप आहेत, फेसबुक पेजवर विविध प्रकारची माहिती दिली जाते. यापुढील काळात वारकरी सांप्रदायाकडून सोशल मीडियाचा वापर वाढणार हे स्पष्ट आहे.
एकंदरीत सुमारे 335 वर्षांची पालखी सोहळ्याची परंपरा यंदा स्थगित करावी लागली असली तरी घरी बसून वारकरी हायटेक होऊन वारीचा अनुभव घेतो आहे. संत सावता माळी, संत कूर्मदास यांना देव त्यांच्याकडे जाऊन भेटल्याच्या आख्यायिका आहेत. याच परंपरेत आता वारकर्यांना घरी बसून देव भेटत आहे. आणि ” ठायीच बैसोनि करा एक चित्त “
या संतवाणीचा अंगीकार करीत आहेत.