पर्मनंट ‘पालक’मंत्री : विजयदादा

कोरोना आला, महापूर आला, दुष्काळ आला, रस्त्यावर खड्डे पडले, जिल्ह्यातील विकास कामांसाठी निधी कमी पडला की जिल्ह्याची राजकीय पीछेहाट झाली, प्रत्येक वेळी आठवतात विजयसिंह मोहिते पाटील,
जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्यातील जेष्ठ मंत्री, उपमुख्यमंत्री आणि खासदार म्हणूनही त्यांना जिथं जिथं संधी मिळाली तिथं तिथं त्यांनी जिल्ह्याच्या विकासाचा विचार केला, जिल्ह्यातील जनतेच्या, शेतकऱ्यांच्या, युवकांच्या हिताचा विचार केला.
म्हणूनच अर्ध्याहून अधिक दुष्काळी असलेल्या सोलापूर जिल्ह्याचे सर्वांगीण स्वरूप विकसीत जिल्हा असे दिसते. राज्यातील सत्ता, सहकार, सच्चे सहकारी, प्रामाणिक, कर्तव्यदक्ष कार्यकर्ते यांची मजबूत फळी उभा करून विजयदादांनी सोलापूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधला.
त्यांच्यावर राज्यात जी म्हणून जबाबदारी पडेल ती पूर्ण ताकदीने पार पाडली आणि राज्याच्या विकासात हातभार लावत असताना त्यांनी जिल्ह्याच्या विकासाचा रथ ही त्याच हातानी ओढला. 2009 पर्यंत विजयदादा राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री होते, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री होते. तोवर जिल्ह्याचा गाडा अगदी सुरळीतपणे सुरू होता.
मात्र 2009 साली राजकीय अपघात झाला आणि जिल्ह्याची विकासयात्रा रस्ता सोडून घसरली. ती अद्यापही मूळ मार्गाला आलेली नाही. येणार तरी कशी, या विकास रथाला ओढण्यासाठी आवश्यक तेवढी ताकद असलेले मनगट विद्यमान नेतृत्वाकडे नाही.

गेल्या 10 वर्षात जिल्ह्याची सर्वच बाबतीत पीछेहाट झाली. त्याला कारण संपूर्ण जिल्ह्याच्या विकासाची तळमळ, व्हिजन असलेलं नेतृत्व जिल्ह्यात नाही. जो तो केवळ आपल्या तालुक्यापुरता विचार करतोय, त्यामुळेच सोलापूर जिल्हा विकासात मागास ठरतोय..
विजयदादा यांनी राज्याचे नेतृत्व करीत असताना ही जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील विकास कामांकडे लक्ष दिले. आज परिस्थिती अशी आहे की, आजच्या मंत्र्यांना, पालक मंत्र्यांना त्यांच्या – त्यांच्या मतदारसंघात ही प्रश्न सोडवता येत नाहीत. त्यामुळेच जिल्ह्यातील जनतेला पदोपदी पालकमंत्री म्हणून विजयदादानी केलेल्या कामाची आठवण येते.

youtube चॅनेल पहा, आणि subscribe करा

सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांनी जिल्ह्यातील रस्त्यांची कामे करून घेतली, पालकमंत्री असताना उजनीच्या पाण्याचे नेटके नियोजन करीत होते, इतकेच नाही तर जिल्ह्याच्या हितासाठी पुण्याचे पालकमंत्री असताना पुणे जिल्ह्यातील धरणातून दुष्काळात पाणी आणण्याची धमक ही त्यांनी दाखवली.
ग्रामविकास मंत्री असताना सोलापूर जिल्ह्यास सर्वाधिक निधी आणून गावे विकसित करण्याचा प्रयत्न केला, जिल्ह्यातील अनेक पर्यटन क्षेत्रांना भरघोस निधी हे खाते त्यांच्याकडे असतानाच मिळाला. वयाची 75 गाठल्यानंतरही दिल्लीत गेलेल्या विजयदादानी पंढरपूर – लोणंद रेल्वे मार्गाचा प्रश्न कुशलतेने सोडवला, या मार्गासाठी आर्थिक तरतूदही करवून घेतली. जिल्ह्यातील पालखी मार्गावरील ग्रामपंचायतीसाठी आषाढी यात्रा अनुदान सुरू केले. सहकारी बँका, पतसंस्था, सोसायट्या, जिल्हा दूध संघ, जिल्हा बँक विजय दादांच्या मार्गदर्शक नेतृत्वाखालीच उत्कर्षास गेल्या.
जिल्ह्याचा दुष्काळ पूर्णपणे संपवून, भविष्यातील पाण्याची गरज पूर्ण करू शकेल अशा कृष्णा – भीमा स्थिरीकरण योजनेचे स्वप्न दादांनी पाहिले, ते स्वप्न घेऊन आज आ रणजितसिंह मोहिते पाटील प्रयत्नशील आहेत.

आज सोलापूर जिल्ह्यात कोरोनाची दहशत आहे, सोलापूर शहरात तर 1400 पेक्षा जास्त कोरोनाग्रस्त लोक आहेत, प्रशासनावर धाक असलेले नेतृत्व नाही म्हणूनच हा विषाणू पसरला असल्याचे लोक बोलत आहेत. पालकमंत्री जर विजय दादांसारखे कुशल, झपाटून काम करणारे असते तर कोरोनाचा पायबंद करता आला असता. मात्र राजकीय नेतृत्वाकडे इच्छाशक्तीचा अभाव दिसतो.
म्हणूनच जेव्हा- जेव्हा जिल्ह्यावर संकट येते तेंव्हा -तेंव्हा
आज ‘ विजयदादा पालकमंत्री असते तर ‘,
असं लोक सहज बोलून जातात.

आज सोलापूर जिल्हा नेतृत्वहीन झालेला आहे, ज्यांनी दादांच्या नेतृत्वाचा द्वेष केला, त्यांचे पंख कापण्याचा प्रयत्न केला ते तरी माझ्या कठीण काळात कुठं सक्षम ठरले आहेत ? ज्यांनी ज्यांनी विरोध केला त्यांच्या मर्यादा त्यांच्या मतदारसंघातही उघड्या पडल्या आहेत. आजच्या काळात हे लोकही उघडे पडले आहेत, त्यामुळे च जिल्ह्यातील जनतेला पुन्हा पुन्हा विजयदादांच्या नेतृत्वाची आठवण येते, त्यांच्या कार्याची उजळणी होते.

सत्ता असो किंवा नसो विजयदादांनी नेहमीच जिल्ह्याच्या विकासाचा विचार केला. मात्र आता विजयदादा जवळपास निवृत्त झाले आहेत, वयाच्या ऐंशीकडे वाटचाल करीत असताना दादांकडून आणखी अपेक्षा करणे उचित नाही. तरीही विजयदादा घरात बसून नसतात, लोकांना भेटतात, त्यांना प्रश्न विचारतात, ते सोडवण्यासाठी आजही प्रयत्न करतात, कर्मयोगी असणं यालाच म्हणतात.
दादांनी घालून दिलेल्या या कार्यपद्धतीच्या वाटेवरून काही पावले टाकली तरी जिल्ह्यातील जनतेला दिलासा मिळेल..

Leave a Reply

error: Content is protected !!