अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश : शिरूर मध्ये खा. अमोल कोल्हेंशी करणार दोन हात
शिरूर : eagle eye news
शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी तब्बल २० वर्षानंतर राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट ) मध्ये मंगळवारी प्रवेश केला आहे. महायुतीच्या जागा वाटपात शिरूरची जागा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेल्याने शिवसेना ( एकनाथ शिंदे गट ) सोडून २० वर्षांनी आढळरावांनी घरवापसी केली आहे.
आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत शिवाजीराव आढळराव यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशाने शिरूर लोकसभा मतदारसंघातील लढत अंतिम झाली असून आढळराव पाटील हे शरद पवार गटाचे उमेदवार आणि विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हेंना टक्कर देतील. मागील निवडणुकीत ‘राष्ट्रवादी’चे कोल्हे यांनी शिवसेनेचे खासदार आढळराव यांचा पराभव केला होता.
२० वर्षानंतर आढळराव पाटील स्वगृही परतले !
मंचर येथे उद्या, मंगळवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पक्षप्रवेश पार पडणार आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे शिवाजीराव आढळराव पाटील विरुद्ध शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे अशी लढत निश्चित मानली जात आहे.आंबेगाव तालुक्यात दिलीप वळसे पाटील, शिवाजीराव आढळराव पाटील आणि देवेंद्र शहा यांची मैत्री सर्वांना माहिती आहे. शिवाजीराव आढळराव पाटील हे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष होते. मात्र ज्यावेळी २००४ चा निवडणुकीत आढळराव पाटील यांना खेड मतदारसंघातून उमेदवारी नाकारण्यात आली. त्यावेळी आढळराव पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. २००४ साली मोठ्या मताधिक्याने ते निवडून आले होते.
शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून निर्माण झालेला पेच सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी शुक्रवारी झालेल्या बैठकीत आढळराव यांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरला. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता जोर धरू लागली आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर दोन गट पडले. त्यात आता शिरूर लोकसभा मतदारसंघातून दोन्ही पवारांचे अस्तित्व पणाला लागणार आहे.