अजितदादा : संवेदनशील तरीही कर्तव्यकठोर प्रशासक !

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आ. रोहित पवार यांचा विशेष ब्लॉग

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा आज वाढदिवस.

लेखन : आ.रोहित पवार

खरंतर यानिमित्त अजितदादांबद्दल प्रत्येकाचे वेगवेगळ्या प्रकारचे अनेक अनुभव आहेत. माझं तर कौटुंबिक नातं असल्यामुळं लहानपणापासून मी दादांना बघत आलोय. कामाचा प्रचंड उरक, धडाडीने निर्णय घेण्याची क्षमता, झोकून देऊन काम मार्गी लावण्याची सवय, कमालीची शिस्त, वक्तशीरपणा, कोणत्याही परिस्थितीत दिलेला शब्द पाळणारे, दूरदर्शी, कठोर प्रशासक अशा कितीतरी गोष्टींचा उल्लेख आवर्जून करावा लागेल.


मंत्रालयात असो किंवा राज्याच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात भेटलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला आणि नागरिकाला अजितदादांनी एकदा शब्द दिला की संबंधित नागरिक किंवा कार्यकर्ता हा निर्धास्त राहतो. कारण त्याला विश्वास असतो की हा अजितदादांचा शब्द आहे, यात कोणताही बदल होणार नाही आणि आपलं काम हे शंभर टक्के होईल. एखादं काम नियमात बसत नसल्याने किंवा अन्य करणांनी होत नसेल तर संबंधित व्यक्तीला खोटं बोलून आश्वासनावर झुलवत ठेवण्याच्या वृत्तीचा त्यांना प्रचंड तिटकारा आहे. त्यामुळं पहिल्याच भेटीत संबंधित कामाचा त्यांनी सोक्षमोक्ष लावलेला असतो.

अनेकदा राज्याच्या वेगवेगळ्या भागातून नागरिक आपल्या कामासाठी थेट मंत्रालयात येत असतात. त्यामुळं अशा लोकांना पैसे आणि वेळ खर्च करून इतक्या लांब येण्याची गरज नाही. संबंधित विषय पालकमंत्री, स्थानिक आमदार किंवा वरिष्ठ अधिकारी यांनीच मार्गी लावावा आणि तरीही काम होत नसेल तरच मंत्रालयात यावं, ही त्यांची अपेक्षा असते. मतदारसंघातून आलेल्या नागरिकाला तर ते तशा सक्त सूचना देत असतात, कारण ते दर आठवड्याला बारामतीत येऊन भेटायला आलेल्या प्रत्येक नागरिकाला भेटून त्याचं म्हणणं ऐकून घेतात आणि त्याचं समाधान करतात. यावरून अजितदादा लोकांच्या वेळेचा, पैशाचा अपव्यय होऊ नये याची किती काळजी घेतात, हे लक्षात येतं.

अजितदादांची कामाची धडाडी तर सर्वश्रुत आहे. याबाबत नुकताच आलेला एक अनुभव सांगतो. ‘एमपीएससी’च्या विद्यार्थ्यांबाबतचा विषय घेऊन माझ्यासह काही विद्यार्थीही त्यांना भेटले. यावेळी त्यांनी इतर सगळी कामं बाजूला ठेवून हा विषय समजून घेतला आणि मुख्यमंत्र्यांकडंही मांडला. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर तातडीने राज्यमंत्री दत्तामामा भरणे यांच्यासोबत या विषयाशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन हे सगळे विषय मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या. तसंच दत्तामामा भरणे यांच्यासोबत ते या विषयाचा नियमितपणे आढावाही घेत आहेत आणि मला विश्वास आहे की त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे ‘एमपीएससी’च्या विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लागतील.


वेळेच्या बाबतीत तर आदरणीय पवारसाहेब आणि अजितदादा यांची बरोबरी कुणीही करू शकत नाही. एखाद्याला वेळ दिली तर त्यात किंचितही बदल होत नाही. मी तर म्हणेन की एखाद्या वेळी अजितदादांना उशीर झाला तर कदाचित वेळसुद्धा त्यांच्यासाठी थांबेल. ही अतिशयोक्ती असली तरी यातून अजितदादांच्या वक्तशीरपणाचा दाखला मला द्यायचाय, हे तुमच्या लक्षात आलंच असेल. सकाळी बरोबर ७ वाजता त्यांच्या कामाला सुरुवात होते आणि काम संपवायला रात्री ११ तर कधी १२ ही वाजतात. सलग १६-१७ तास कामांचा निपटारा करणं हे सोपं नाही, पण अजितदादांचा उरक आहेच तेवढा!
अजितदादांच्या कोणत्याही बैठकीला उपस्थित रहायचं असेल तर संबंधित अधिकाऱ्यांना गृहपाठ आणि अभ्यास करण्याशिवाय पर्यायच नसतो. अन्यथा संबंधितांची कशी फजिती होते याचा अनुभव अनेक अधिकाऱ्यांनी घेतला आहे. अनेकदा अशा बैठकांना उपस्थित राहण्याची संधी मला मिळाली. त्यावेळी मी हे सर्व बघितलंय.

अजितदादांचा स्वभाव वरून कितीही कठोर वाटत असला तरीही ते मनाने तसे नाहीत, हे त्यांचा पुतण्या म्हणून मला ठाऊक आहे. शेतकरी, सर्वसामान्य नागरिक यांच्या बाबतीत तर ते कमालीचे संवेदनशील आहेत. काही अधिकारी कामचुकारपणा करत असतील, लोकांना त्रास देत असतील, त्यांची अडवणूक करत असतील आणि याची तक्रार अजितदादांकडं आली तर काय होतं, याचा अनुभव अनेक अधिकारी खासगीत सांगतात. तसंच एखाद्या विषयाबाबत निर्णय घेताना ते सर्व अंगांनी विचार करतात पण निर्णय घेताना तो लोकांसाठी किती महत्त्वाचा आहे हे लक्षात घेऊन तो रेंगाळणार नाही याचीही काळजी घेतात. निर्णय घेण्याच्या त्यांच्या या धडाडीमुळं काही वेळा त्यांना अडचणीही आल्या मात्र लोकाभिमुख प्रशासन चालवताना परिणामांची चिंता करायची नसते, अशी त्यांच्या कामाची पद्धत आहे आणि त्यांच्या या धडाडीचा मला प्रचंड हेवा वाटतो.


आज वाढदिवसानिमित्त अजितदादांना माझ्या मनस्वी शुभेच्छा! त्यांच्या हातून लोकांची अशीच सेवा घडत राहो आणि त्यासाठी त्यांना निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना!

Leave a Reply

error: Content is protected !!