आ.समाधान आवताडे यांना घरातच धक्का !
मंगळवेढा : प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्यातील बडे राजकीय प्रस्थ आणि आ. समाधान आवताडे यांचे चुलते बबनराव अवताडे यांनी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांना पाठिंबा जाहीर केला आहे. या पाठिंब्यामुळे मंगळवेढा तालुक्यामध्ये भगीरथ भालके यांच्या विजयाची समीकरणे आणखी मजबूत होत असल्याचे दिसून येत आहे.
मंगळवेढा तालुक्यात बबनराव आवताडे यांचे मोठे राजकीय प्रस्थ आहे. त्यांच्या गटाची बुधवारी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेशर आवताडे यांच्या नेतृत्वाखाली बैठक संपन्न झाली. यावेळी सिद्धेश्वर आवताडे यांनी काॅग्रेस उमेदवार भगीरथ भालके यांना पाठींबा दिल्याचे बुधवारी जाहीर केले.
यावेळी जेष्ठ नेते बबनराव अवताडे, काँग्रेस उमेदवार भगीरथ भालके यांच्यासह व्यंकट भालके आणि आवताडे समर्थक जमीर सुतार,चंद्रकांत काकडे ,धनंजय पाटील, दिलीप सावंत, संजय पवार,दया सोनगे, विजय जाधव,मनोज खांडेकर,प्रकाश जुंदळे,सतोष सोनगे,सचिन नकाते,शंभू नागणे,काका डोंगरे,दौलत माने,गुलाब थोरबोले, यांच्यासह अवताडे समर्थक उपस्थित होते.
यावेळी बोलताना भगीरथ भालके यांनी, चुकीचा माणूस बदलण्यासाठी सुरू असलेल्या लढाईला बबनराव अवताडे व त्यांच्या समर्थकांनी दिलेले पाठबळ निश्चित आहे. भविष्यात नगरपालिका व इतर निवडणुका त्यांच्या सोबतीला घेऊन लढवल्या जातील,असे सांगितले.
बबनराव आवताडे यांचेकडे खरेदी विक्री संघ, कृषी उद्योग संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सोसायटी, दामाजी नगर या मोठ्या ग्रामपंचायतीसह लगतच्या काही ग्रामपंचायतीवर त्यांचे वर्चस्व आहे. पोटनिवडणुकीत भगीरथ भालके यांचा निसटत्या मतांनी पराभव झाला. त्यामध्ये सिद्धेश्वर अवताडे यांना पडलेली मते देखील त्या दृष्टीने निर्णायक ठरली होती.
लोकसभा निवडणुकीमध्ये बबनराव अवताडे यांनी खासदार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा दिला होता, त्यामुळे तालुक्यामध्ये या मतदारसंघात 45 हजार 523 या मताधिक्यात अवताडे यांची मते देखील निर्णायक ठरली होते. अशा परिस्थितीत त्यांनी भालके यांना दिलेला पाठिंबा महत्वपूर्ण ठरला आहे.
ठेकेदाराची सुरू असलेली मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी सर्वसामान्य जनतेतून त्यांना सोबत घेऊन जाणारा उमेदवार असावा अशी मागणी सर्व समर्थकानी ज्येष्ठ नेते बबनराव अवताडे यांच्यासमोर मांडली सर्वांच्या चर्चेनंतर आम्ही भगीरथ भालके यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे सिद्धेश्वर आवताडे यांनी यावेळी सांगितले.