जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण : गाफिल प्रशासनामुळे कोरोनाचा फास आवळतोय
बार्शी : ईगल आय मीडिया
भगवंताची नगरी म्हणून ओळख असणार्या बार्शीला आता कोरोनाचा फास दिवसागणिक आवळला जात असल्याचे पहायला मिळत आहे. दररोज कोरोनाचे रूग्ण शहर व तालुक्याच्या विविध भागांमध्ये आढळून येत असल्याने नागरिकांच्या जिवाचा घोर वाढला आहे. प्रशासनाचे ढिसाळ नियोजन अन् बेफिकीर बार्शीकरांमुळे भगवंतनगरी कोरोना संकटाच्या खाईत लोटली जात आहे. सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बार्शी तालुक्यात सर्वाधिक रुग्ण झाले आहेत. बार्शीला वाचविण्यासाठी कोरोना प्रसाराची साखळी तोडणे आता अपरिहार्य झाले असून त्यासाठी प्रशासनाने अत्यंत प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज आहे. त्याबरोबरच नागरिकांनीही आता सावध होव आपली स्वतःची तरी काळजी घ्यावी अन्यथा कोरोनाचे संकट आणखी गडद होण्याचा धोका वाढला आहे.
बार्शी येथे कोरोनाचा प्रसार वाढू नये म्हणून सुरूवातीच्या काळात प्रभावी उपायोजना करण्यात आल्या होत्या. त्यामुळे येथे सुरुवातीला कोरोनाचा प्रसार झाला नाही. त्यावेळी मात्र बार्शीकर थोडे निश्चिंत होते. आता बार्शीत कोरोनाचा शिरकाव होणारच नाही, असा समज बार्शीकरांबरोबरच येथील शासन, प्रशासनाने करून घेतला असावा. त्यामुळे लॉकडाऊन शिथील होताच बार्शीमध्ये ही बाजारपेठा सुरू करण्यास प्रशासनाने मुभा दिली. कोरोनाचा प्रार्दुभाव होऊ नये म्हणून खबरदारीचे सर्व उपाय करण्याच्या सूचना व्यापारी व नागरिकांना दिल्या होत्या. परंतु, बार्शीकरांनी कोरोनाला गांर्भियाने घेतले नसल्याचेच दिसून आले, त्यामुळेच कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. प्रशासनही कोरोनाची सम्पर्क शृंखला तोडण्यात अपयशी होत, असल्याचे पहायला मिळत आहे.
सोलापूर, पुणे, उस्मानाबाद येथून मुक्तपणे येणाऱ्या आणि जाणाऱ्या लोकांमुळेही बार्शी शहर, वैराग या मोठ्या शहरांबरोबरच तालुक्यातील इतर 15 हून अधिक गावांमध्ये कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत आहे. कोरोनाचा प्रसार वाढण्यास प्रशासनाबरोबरच नागरिकही जबाबदार आहेत. गर्दी होऊ नये म्हणून प्रशासनाकडून प्रभावी अंमलबजावणी होणे अपेक्षित होते. परंतु, तसे झाले नाही. नागरिकांचे या बेबंद वागण्यास आणि त्याला पायबंद घाणण्यास प्रशासनाला पूर्णपणे अपयश आल्याचे पहायला मिळाले.
नागरिकांनी स्वंय संरक्षणासाठी आवश्यकता नसताना गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे गरजेचे होते. तसेच गर्दीच्या ठिकाणी जावेच लागले तर तोंडाला मास्क वापरणे अत्यावश्यक होते. परंतु, अनेक गर्दीच्या ठिकाणी विना मास्क नागरिक बेफिकिरपणे फिरताना दिसून येत होते. त्याचबरोबर शहरात विविध ठिकाणी नाष्ट्याचे गाडे, नाष्टा सेंटरही सुरू असल्याचे पहायला मिळाले. अनलॉकच्या काळात बार्शी शहरात सर्वत्र प्रचंड गर्दी पहायला मिळत होती. घरगुती समारंभ, मयतीलाही बिनधास्त गर्दी होत असल्याचे दिसून आले आहे. परंतु, येथे कोरोना होऊ नये म्हणून खबरदारीचे उपाय योजले जात नसल्याचेच दिसून येत होते.
बार्शी शहरामध्ये एक सहकारी आणि एक खासगी हॉस्पिटल कोविड सेंटर म्हणून घोषित करण्यात आले आहेत. कोविड सेंटरमधील एका दवाखन्यामध्ये कोरोनाने मृत्यू झालेल्या मृतदेहाला हाताळताना निष्काळजी केल्याचे पहायला मिळाले आहे. यावेळी त्या दवाखन्यातील कर्मचार्याने पीपीई किट न घालताच कोरोनाबधित रूग्णाचा मृतदेह शववाहिकेमध्ये ठेवताना चित्रफितीमध्ये कैद झाले आहे. अशा एक ना अनेक गंभीर प्रकारामुळेच बार्शी व तालुक्यामध्ये कोरोनाचा झपाट्याने प्रसार होत आहे.
सध्या शहर व तालुक्यामध्ये तब्बल 495 कोरोनाबाधित रूग्ण आहेत. तर शहरातील 65 भागांमध्ये कोरोनाचे रूग्ण आढळून आल्याने ते परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आले आहेत. त्याचबरोबर वैराग, जामगाव (आ), नागोबाची वाडी, उपळे दुमाला यासह इतर काही गावांमध्ये रूग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, 8 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर 110 जण कोरोनामुक्त झाले आहेत. अद्याप 296 जणांवर उपचार सुरू आहेत.
कोरोनाच शृंखला तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील 4 तालुक्यामध्ये पुन्हा लॉकडाऊनची घोषणा केली आहे. यामध्ये बार्शीचाही समावेश आहे. बार्शीमध्ये गेल्या चार दिवसांपासून लॉकडाऊन आहे. परंतु, केवळ बार्शी शहरामध्ये कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी होताना दिसत आहे. शहराच्या हद्दवाढ भागामध्ये नागरिक मुक्तपणे संचार करताना पहायला मिळत आहेत. कोरोनाचे गडद होत चाललेले संकट दूर करण्यासाठी प्रशासनाबरोबरच नागरिकांनही जबाबदारीचे भान ठेवत वागण्याची गरज निर्माण झाली आहे.