दुसऱ्या क्रमांकावर समाधान आवताडे
पंढरपूर : ईगल आय मीडिया
पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूकीच्या अखेरच्या टप्प्यात निवडणुकीच्या निकालावर सट्टे बाजाराने जोरदार उसळी मारली आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार भगिरथ भालके हेच मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा अंदाज बांधून सट्टेखोरांनी भालकेच्या नावाला अधिक पसंती दिली आहे. या निवडणुकीत १९ उमेदवार रिंगणात असले तरी मुख्य लढत ही राष्ट्रवादी आणि भाजप या दोन पक्षात आहे. त्यामुळे या दोन नावावर सट्टेखोरांचा जोर आहे.
त्यामुळे भगीरथ भालके यांच्या नावावर सट्टा लावणाऱ्याला शंभर रुपयाला पन्नास रुपयांचा दर निघाला आहे. तर भाजप उमेदवार समाधान अवताडे यांच्या नावाला दुसरा क्रमांक मिळाला असल्याने त्यांच्या नावावर सट्टा लावणाऱ्याला शंभर रुपयास शंभर रुपये असा दर निघाल्याची चर्चा सट्टे बाजारात सुरु आहे.
भगीरथ भालके यांच्या मताधिक्यावर पंढरपूर तालुक्यात अनेकांनी पैजा लावल्या आहेत. 2009 साली कै भारत भालके यांनी मिळवलेल्या मताधिक्यपेक्षा अधिक लीड भगीरथ भालके यांना मिळेल अशी शक्यता पैजेवर व्यक्त केली जात आहे.
विजयाच्या सट्टे बाजाराबरोबर उर्वरित उमेदवार किती मते घेतात कोणाचे डिपॉझिट जप्त होते. यावर मोठी आर्थिक उलाढाल सट्टे बाजारात लागली आहे. सध्या देशात आय पी एल क्रिकेट सामने सुरू असले तरी अजूनही अपेक्षेनुसार आय पी एल मध्ये क्रिकेट प्रेमींकडून सट्टा लावला जात नाही. कोरोना मुळे आय पी एल निस्तेज झाली असून आय पी एल कडे फारसे लक्ष गेले नाही. मात्र पंढरपूर ची पोटनिवडणूक लक्षवेधी झाली असून सट्टा बाजार यामुळे दोन दिवसांपासून तेजीत आल्याची चर्चा आहे.
ग्राउंड लेव्हलवर माहिती घेऊन सट्टा बाजार आणि पैजा लावणारे जोखीम घेत असतात. त्यामुळे मतदानाच्या एक दिवस अगोदरच भगीरथ भालके यांचे पारडे जड झाले असून त्यांच्या विजयावर मोठ्या रक्कमा लावल्या जात असल्याचे सट्टा बाजारातून सांगितले जाते. शेवटी मतदारराजा हा सर्वश्रेष्ठ आहे सट्टे बाजार हा जुगार आहे नेमकं काय घडणार ते 2 मे रोजी उघड होईल.