अडचणींवर मात करीत उमेदवारी मिळवली

निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात भगीरथ भालके यशस्वी

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस ची उमेदवारी मिळवण्यात भगीरथ भालके यांना यश मिळाले आहे. त्यांच्या ऐवजी त्यांच्या मातोश्री श्रीमती जयश्रीताई भालके यांना उमेदवारी मिळावी यासाठी अनेक हित चिंतक धडपड करीत होते. मात्र या सर्वांवर मात करीत अतिशय शांतपणे भगीरथ भालके यांनी उमेदवारी मिळवण्यात बाजी मारली आहे. निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यात त्यांनी यश मिळवले असले तरी पुढचा टप्पा त्यांच्यासाठी अधिक कठीण असणार आहे. त्यात ते कशा प्रकारे लढत देतात यावर त्यांचे निवडणुकीतील अंतिम यशापयश अवलंबून आहे.

आम.भारत भालके यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबातच उमेदवारी मिळणार हे सर्वांना अपेक्षित होते. मात्र ती श्रीमती जयश्रीताई ना मिळते की भगीरथ भालके यांना याकडे लक्ष लागले होते. भालके कुटुंबात उमेदवारी मिळू नये यासाठी सुरुवातीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा घडवण्यात आली. त्यांनतर जे पक्षातच नाहीत, त्यांच्या ही नावाची चर्चा माध्यमातून रंगवली गेली. त्यानंतर राष्ट्रवादी मध्ये भगीरथ भालके यांना मोठा विरोध आहे हे दर्शवण्याचा प्रयत्न झाला आणि पक्षातच त्यांना एकाकी पाडण्याचा प्रयत्न केला.

चोहोबाजूंनी संकटं, अडचणींना तोंड देत भगीरथ भालके वाटचाल करीत राहिले आणि यातूनच त्यांचे नेतृत्व गुण सिद्ध झाले आहेत. राष्ट्रवादीची उमेदवारी घरात मिळत असताना ती आपल्यालाच मिळावी यासाठी त्यांनी केलेले नियोजनबद्ध प्रयत्न पक्षांतर्गत आणि बाहेरील ही विरोधकांना मात देणारे ठरले आहेत. पक्षाची उमेदवारी मिळवून भगीरथ भालके यांनी पहिल्या टप्प्यात यश मिळवले असले तरी खरी लढाई आता सुरू झाली आहे. त्या लढाईत भगीरथ भालके यांचा खरा कस लागणार आहे. असंख्य अडचणी असूनही भगीरथ भालके हे शांतपणे आपले काम करीत राहिले, सर्व प्रकारच्या वादापासून स्वतःला दूर ठेवले आणि लोकांशी संपर्क ठेवत मतदारसंघातील विकास कामे मंत्र्यापर्यंत घेऊन गेले.

निवडणूक पंढरपूर – मंगळवेढा विधानसभेची असताना विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे विषय उचलून भगीरथ भालके यांची कोंडी करण्याचे प्रयत्न झाले, ते अजूनही सुरूच आहेत. हे सगळे घडत असताना महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवसेना महिला आघाडीच्या प्रमुख शैला ताई गोडसे यांची बंडखोरी समोर उभा झाली आहे. जयश्री ताई भालके यांची उमेदवारी असेल तर निवडणूक बिनविरोध ही होईल अशाही अटकळी बांधल्या गेल्या आणि भगीरथ भालके यांची वाट अडवण्याचा प्रयत्न झाला.

मागील आठवड्यात पंढरपूर दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या बैठकीत अनेकांनी गोंधळ घालण्याचा आणि थेट भगीरथ भालके यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला.पक्ष श्रेष्ठींनी सुद्धा उमेदवारी जाहीर करण्यास उशीर लावला, कदाचित यातून भगीरथ भालके यांना पक्षाने तावून, सुलाखून घेतले असावे. आणि सोमवारी त्यांची उमेदवारी जाहीर केली. जनता, कार्यकर्ते, पदाधिकारी, पक्ष आणि पक्ष नेतृत्व ही त्यांच्या पाठीशी उभा असल्याने भगीरथ भालके पुढच्या लढाईत या सर्वांच्या अपेक्षांवर खरे ठरतात का हे दिसून येईल.

Leave a Reply

error: Content is protected !!