3 निवडणुका, 3 डाव आणि पेचात विरोधक

आ.भारत भालके यांचे राजकीय आखाड्यातील निर्णायक डाव पेच

पंढरपूर : ईगल आय मीडिया

2009, 2014 आणि 2019 तिन्ही निवडणुका वेगळ्या आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीत लढवून या 3ही विधानसभेच्या निवडणुका जिंकताना आ.भारत भालके यांनी जे डाव टाकले त्यामुळे विरोधक पेचात पडले आणि भारत नाना यांनी विजयाची लाल माती उधळली.

आ.भारत नाना भालके हे काही राजकीय वारसा असलेल्या सधन, संपन्न घरातील नव्हते. सरकोली येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेले भारत नाना लाल मातीच्या आखाड्यात रमले, कुस्तीच्या अनेक आखाड्यात भालके यांनी विजयाचा जल्लोष साजरा केला. मात्र तेथून खा. शरद पवारांच्या प्रभावातून त्यांनी राजकीय आखाड्यात प्रवेश केला. विठ्ठल सहकारी साखर कारखाण्याचे संचालक, उपाध्यक्ष ते अध्यक्ष अशी मजल मारल्यानंतर भालके यांना विधानसभेचे वेध लागले.

निवडून आलाय शरद पवारांचा पठ्ठा ! (Vdo)

2004 सालची विधानसभा ते केवळ सराव म्हणूनच लढले. 2009 साठी त्यांनी कसून सराव सुरू केला तोवर मतदारसंघ पुनर्रचना झाली आणि मंगळवेढा तालुका जोडला गेला. लगेच भारत नानांनी मंगळवेढा तालुक्यात मोर्चे बांधणी सुरू केली. 35 गावचा पाणी प्रश्न उचलून धरला आणि त्या तालुक्यातही आपली तालीम तयार केली. तत्कालीन आमदार सुधाकरपंत परिचारक यांच्याशी लढाई होईल हे गृहीत धरून भालके यांनी तयारी केली मात्र, नाट्यमय राजकीय घडामोडी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील या मतदारसंघात उमेदवार म्हणून आले.

त्यांच्या दिमतीला राज्यातील सत्ता, अनेक मंत्री, दोन खासदार, मोहिते पाटलांची बलदंड यंत्रणा असताना भारत नाना एकाकी लढले, त्यावेळी त्यांच्या पाठीशी दोन्ही तालुक्यातील सर्व सामान्य जनता मोठ्या ताकदीने उभा राहिली. आ.भारत नाना आम आदमीचा आवाज बनून उभा राहीले आणि राज्यात सर्वाधिक धक्कादायक निकाल घेऊन विधानसभेत पोहोचले. त्यावेळी भारत नानांनी विजयसिंह मोहिते पाटलांना तुम्ही पंढरपूर-मंगळवेढ्यातून लढणार आहेत का ? मी तयारी करतोय, ऐनवेळी तुम्हि आलात तर माझी पंचाईत होईल अशी विचारणा केली होती. त्यावेळी विजयदादानी तुम्ही तयारी करा, मी तिकडे येणार नाही असे सांगितले होते. म्हणून मग जेव्हा खरंच विजयदादा आले तेव्हा भारत नाना मागे हटले नाहीत. आणि त्यांचे राजकीय संबंध ही बिघडू दिले नाहीत.

2014 ची विधासनभा निवडणूक आणखीन वेगळी होती. राज्यात मोदी लाट प्रचंड मोठी होती आणि काँग्रेस – राष्ट्रवादी च्या सरकार बाबत प्रचंड नाराजी होती. मात्र मोठ्या राजकीय कौशल्याने भारत नानांनी मंगळवेढा तालुक्यातील 35 गावचा पाणी प्रश्न सोडवला होता आणि त्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे मोठे सहकार्य लाभले होते, त्यांना दिलेल्या शब्दाखातर भारत नानांनी काँग्रेसची उमेदवारी घेतली आणि निवडणूक लढवून जिंकले सुद्धा. यावेळच्या निवडणुकीत भालके यांचा सामना प्रशांत परिचारक या तगड्या उमेदवाराशी झाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसह महायुतीचे अनेक नेते प्रचारासाठी येथे धूळ झाडून गेले तरीही गनिमी कावा खेळत भारत नानाच निवडून आले. विशेष म्हणजे त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून ते संपूर्ण प्रचार काळात एकही मोठी सभा घेतली नाही. 5 ते 6 गावात मिळून एक सभा घेतली, त्या सभा जंगी झाल्या. मात्र भारत नाना शक्ती प्रदर्शन करण्यात कमी पडले, त्यांचा मागे लोक नाहीत असा समज करून घेत विरोधक गाफील राहिले आणि मोदींच्या सभे नंतरही पंढरपुरात भारत नाना च जिंकले.

2019 निवडणुकीपूर्वी लोकसभा निवडणुकीत भारत नानांच्या मतदारसंघात काँग्रेस ला मोठे मताधिक्य मिळवून दिले होते, त्यामुळे नाना जिंकतील अशी खात्री बाळगून शिवसेने सह भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी सुद्धा2 त्यांना उमेदवारी देण्यास तयार होती. स्थानिक पातळीवर परिचारक जरी भाजप मध्ये असले तरी त्यांना ही भारत नाना भाजपची उमेदवारी मिळतील अशी शंका होती तर शिवसेना आणि काँग्रेस सह राष्ट्रवादी सुद्धा उमेदवारी देण्यास तयार होती. मात्र भारत नानांनी यावेळी सुद्धा असे काही डाव टाकले की, विरोधक पेचात अडकून पडले, अर्ज भरण्याच्या अगोदर काही दिवस परिचारक आणि समाधान अवताडे याना कोणत्या पक्षाची उमेदवारी घ्यावी हेच सुचले नाही.

शेवटी भारत नानांनी राष्ट्रवादी ची उमेदवारी घेतली आणि परिचारिका भाजपची उमेदवारी घ्यावी लागली. वास्तविक अवताडे आणि परिचारक दोघानाही मिळाली तर राष्ट्रवादी ची उमेदवारी हवी होती. मात्र भारत नानांनी सगळ्याच पक्षात रुमाल टाकून जागा अडवून ठेवली होती. मे महिन्यात च नाना नी खा. शरद पवारांना पक्षात येऊन उमेदवारी घेण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार आपल्या मर्जीने डाव टाकत भारत नाना निवडणूक लढले आणि पेचात पकडलेल्या पंतांना ही मैदानात अस्मान दाखवले.

तिन्ही निवडणुकीत भारत नानांनी वेगवेगळे डाव पेच वापरून विरोधकांना नामोहरम केले आणि राजकीय वारसा नसतानाही सामान्य शेतकरी कुटुंबातील व्यक्ती ही राजकारणात बलदंड होऊ शकतो हे दाखवून दिले.

Leave a Reply

error: Content is protected !!