मागील दोन वर्षे धरण व्यवस्थापनामुळे ओढवली पूरस्थिती
पंढरपूर : ईगल आय मीडिया
उजनी धरण आज ( 27 रोजी ) सकाळी 37 टक्के भरले आहे. पावसाळ्याचे अजूनही सव्वा दोन महिने बाकी आहेत, आणि पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये सरासरी सत्तर टक्के पर्यंत पाणी साठा झालेला आहे. त्यामुळे पुढच्या काळात भीमा नदीला पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी योग्य नियोजन आणि त्याची अंमलबजावणी आवश्यक आहे.
यंदा पावसाने वेळेवर हजेरी लावली, जूनमध्ये काहीशी संथगतीने वाटचाल केलेल्या पावसाने मागील आठवड्यात झोप उडवून दिली. 5 दिवसांत उजनी धरणात 40 टक्के पाणी जमा झाले आहे. तर पुणे जिल्ह्यातील सर्वच धरणे वेगाने भरत आली आहेत.
गेल्या वर्षी 14 ते 17 ऑक्टोबर दरम्यान जिल्ह्यात अतिवृष्टी होईल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्यानंतरही उजनी व्यवस्थापन गाफील राहिले आणि 14 अक्टोबर रोजी सुद्धा धरणाची पाणी साठा पातळी 111.28 टक्के एवढी राखली. 13 ऑक्टोबर रोजी उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ही 75 मिलीमीटर पाऊस पडला होता तरीही 14 ऑक्टोबर रोजी सकाळी धरणातून केवळ 10 हजार क्यूसेक ने पाणी सोडण्यात येत होते. 14 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजल्यापासून धरणातून अतिशय मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यास सुरुवात केली. काही तासात भीमा नदीचा विसर्ग 10 हजारावरून 2 लाख 25 हजार क्यूसेक इतका वाढवण्यात आला. त्यामुळे पुणे – सोलापूर महामार्गावर अनेक ठिकाणी धरणातील फुगवठ्याचे पाणी येऊन वाहतूक बंद पडली होती. रात्रीत उजनीतून 2.25 लाखावर क्यूसेक्सचा विसर्ग सोडला होता, त्यामुळे भीमा नदी काठच्या लोकांना हातचे सोडून सुरक्षित ठिकाणी पळ काढावा लागला होता.
सध्या पुणे जिल्ह्यातील सर्व धरणांत सरासरी 70 टक्के पर्यंत पाणी साठा झाला असून यापुढच्या काळात पुणे जिल्ह्यातील धरणांतून पाणी सोडले जाणे अपेक्षित आहे. उर्वरित 2 महिन्यांच्या पाऊस काळात उजनी धरणातून भीमेला पाणी सोडण्याची परिस्थिती निर्माण होणार आहे. मात्र गेल्या दोन वर्षांचा धरण व्यवस्थापनाचा अनुभव पाहता पूरस्थिती टाळण्यासाठी पक्क्या नियोजनाची गरज आहे. 2019 आणि 2020 या दोन्ही साली भीमा नदीला पूरस्थिती निर्माण झाली होती.
तळी, तलाव भरून घेण्यासाठी कालव्यातून पाणी सोडावे
धरणाची पातळी आज 40 टक्केहून अधिक होणार आहे, दोन्ही कालव्यातून पाणी सोडून त्या माध्यमातून तळी, तलाव भरून घेण्याची गरज आहे. त्या अनुषंगाने उजनीतील पाणी साठ्यावर ही काही प्रमाणात नियंत्रण राखता येणार आहे.
हा अनुभव लक्षात घेता यावर्षी तरी पुरनियंत्रणासाठी योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. यंदाच्या वर्षी धरणे लवकर भरल्याने पूरस्थितीचा धोका अधिक आहे. मात्र मागील दोन वर्षीच्या अनुभवातून धरण व्यवस्थापन काही शिकले असेल का हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे पूरस्थिती आणि संभाव्य नुकसान टाळण्यासाठी जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी आतापासूनच लक्ष घालण्याची गरज आहे.